शिराळा : एकही नागरिक, पशुधन पुरामध्ये अडकून राहणार नाही याची काळजी घ्यावी. चांदोली धरणातून वारणा नदीत सोडण्यात येणारे पाणी, पडणार पाऊस यावर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात अशा सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिल्या.
शिराळा तहसील कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून सुरू आलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे वारणा, मोरणा नदीला पूर आला आहे. हजारो एकर शेती व पिके पाण्याखाली गेली आहेत. वारणा नदीकाठावरील लोकांचे स्थलांतर सुरू आहे. या पूरस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल व पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार नाईक यांनी विभागवार आढावा घेतला.
नाईक म्हणाले, रस्त्यावर पाणी येऊन ज्या गावांचा संपर्क तुटतो तेथे अन्नधान्य, आरोग्य सुविधा निर्माण करून ठेवाव्यात. नदीकाठावरील नागरिक व पशुधन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, पशुधन अधिकारी व यंत्रणा तसेच तहसील कार्यालय व पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी आदींनी सतर्क राहावे. नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.