सांगली : मारुतीराया...हे कोरोनाचे संकट दूर करावे आता असे साकडे शहरातील हनुमान मंदिरांमधील पुजाऱ्यांनी मंगळवारी घातले. शहरातील मंदिरांमध्ये साधेपणाने बंद दरवाजाआड हनुमान जयंती साधेपणाने साजरी झाली. सलग दोन वर्षे भाविकांना या कार्यक्रमांपासून दूर रहावे लागले.रामनवमी पाठोपाठ हनुमान जयंतीलाही मंदिरांचे दरवाजे लॉकडाऊनमुळे बंद राहिले. शहरातील मारुती मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, रतनशीनगरजवळी मारुती मंदिर, पंचशीलनगर, लक्ष्मीनगर, माधवनगर याठिकाणच्या मारुती मंदिरातील पुजाऱ्यांनी जयंतीनिमित्त पुजाविधी पार पाडले. पहाटे साडे तीन वाजल्यापासून मंदिरांमध्ये तयारी सुरु होती. गाभारा व मूर्तीला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. रुद्राभिषेक, जन्मकाळ उत्सव, पाळणा, आरती, नैवेद्य अर्पण असे कार्यक्रम पार पडले.सांगलीच्या पंचमुखी मारुती मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासून पुजाविधी सुरु होती. मोजक्याच पाच लोकांच्या उपस्थितीत येथील कार्यक्रम पार पडले. हनुमान जयंतीनिमित्त पाळणा सजविण्यात आला होता. यावेळी बाबुराव पुजारी, अमोल पुजारी, वामन महिंदरकर, बाळू मुळे, श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
अमोल पुजारी म्हणाले की, साधेपणाने जयंती साजरी करतानाच आम्ही मारुती चरणी कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून प्रार्थना केली. या संकटामुळे सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे म्हणून प्रार्थना करतानाच सर्व पुजाविधी परंपरेप्रमाणे करण्यात आले.सलग दोन वर्षांपासून रामनवमी व हनुमान जयंतीचे कार्यक्रम रद्द झाले.