आटपाडी : कुपोषणमुक्त आटपाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वांनी सही पोषण, देश रोशन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले.
सही पोषण, देश रोशन या उपक्रमांतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत १ ते ३० सप्टेंबर पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत आहे. यादरम्यान सदृढ व सशक्त समाजनिर्मितीकरिता शाश्वत विकास अंतर्गत कुपोषणमुक्त ग्रामपंचायती मोहिमेंतर्गत कुपोषणमुक्तीसाठी योग्य व पोषक आहार बालकांना दिला जावा व कुपोषणावर मात करता यावी यासाठी मातेची व मातेने घ्यावयाची काळजी यासाठी शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी विठ्ठलनगर येथे बैठक झाली.
यावेळी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, विजयराजे पाटील, सुखदेव पाटील उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.