तासगाव : धुळगाव येथे वाळू तस्करी रोखणाऱ्या तलाठ्यांच्या पथकाला, ‘जीप बाजूला घ्या, अन्यथा उडवून लावू’, अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी बुधगाव येथील ए. जी. शिंदे व अन्य एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या आदेशाने तालुक्यातील व परजिल्ह्यातून येणारी वाळू रोखण्याचे काम सुरू आहे. यासाठी विसापूरचे तलाठी श्रीकांत तारलेकर, सुरेश माने व पी. आय. जामदाडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही तस्करी रोखण्यासाठी धुळगाव येथे पहारा देण्याचे त्यांचे काम सुरु होते. यावेळी (एमएच १0, १६३२) हा ट्रक आठ ब्रास वाळू भरून येत होता. यावेळी तलाठ्यांनी ट्रकचालकास थांबण्याचा इशारा करताच ट्रक थांबविण्यात आला. यावेळी ट्रकमध्ये ड्रायव्हर व बाजूला शिंदे बसला होता. त्याने तलाठ्यांना दमदाटी करीत, ‘ही हद्द मिरजेची असून तुमचा येथे काय संबंध?’ अशी विचारणा केली व ट्रक तसाच पुढे पळविला. यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग केला असता, ट्रक सापडला नाही. पण शोध घेतला असता, बुधगाव येथील हाके कॉलनीमध्ये वाळू उतरताना हा ट्रक आढळून आला. महसूल अधिकाऱ्यांना पाहताच सर्वांनी पळ काढला. यावेळी ट्रक ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. शिंदेवर अनेक गुन्हे असल्याचे व तहसीलच्या आवारातील ट्रक पळविल्याचा गुन्हाही असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसात शिंदे व आणखी एकावर गुन्हा नोंद झाला आहे. (वार्ताहर)
जीप बाजूला घ्या, नाही तर उडवून लावू
By admin | Published: October 28, 2015 11:16 PM