शिराळा : युती शासनास शेतकऱ्यांसाठी कितीही कर्ज घ्यावे लागले तरी चालेल, ते कर्ज घेऊन येत्या दोन वर्षात अपुऱ्या सर्व पाणी योजना पूर्ण करु, नंतरच नवीन योजना मंजूर करु, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे मानकरवाडी तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पूजन व वचनपूर्ती निर्णय आयोजित शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.महाजन म्हणाले की, पाण्याचे महत्त्व शेतकऱ्यांनाच समजते. या मतदारसंघात दुष्काळ भीषण आहे हे पाहिले आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करील. याअगोदरच्या शासनाने ७० हजार कोटी खर्च केले. मात्र शेतकऱ्यांना पाणीच नाही मिळाले. त्यांनी नियोजन केले नाही. त्यांच्या शासनातील अनेक गडबड घोटाळे बाहेर येत आहेत. एक माजी मंत्री तुरुंं गात आहेत. बाकीचे तुरुंगात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. येथील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निधी देणे गरजेचे आहे. हे पैसे मिळाले तरच हा विभाग सुजलाम सुफलाम होईल. यावेळी खासदार संजयकाका पाटील, खासदार राजू शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, राहुल महाडिक, विक्रमभाऊ पाटील, सदाभाऊ खोत, अभिजित नाईक, सर्जेराव यादव, सत्यजित नाईक, विजयराव यादव, उत्तमराव निकम, यशवंत दूध संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, नामदेव पाटील आदी उपस्थित होते.सुखदेव पाटील यांनी स्वागत केले, रणधीर नाईक यांनी प्रास्ताविक केले, तर प्रकाश पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
कर्ज घेऊ, पण पाणी देऊ
By admin | Published: April 22, 2016 11:02 PM