इस्लामपूर : नगरसेवक असताना रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना सहकार्य करत नगरपालिकेचे आर्थिक नुकसान करणे बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत येथील विजयभाऊ पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडे नाममात्र भाडेतत्त्वावर असलेली नगरपालिकेची इमारत प्रशासनाने ताब्यात घ्यावी, असे निर्देश नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांनी दिले. निनाईनगरमधील व्यायामशाळा आणि सभागृह ताब्यात घेण्याचा विषय कायदेशीर सल्ला घेण्यासाठी तहकूब ठेवण्यात आला. राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही सभागृहात त्यांच्यावर नमते घेण्याची वेळ आली.
नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी निशिकांत भाेसले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत तहकूब झालेली सर्वसाधारण सभा झाली. आजच्या सभेत विकास आघाडीचे नगरसेवक आक्रमक राहिले होते. तर पूर्वीच्या सभागृहातील राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील ठरावातील भाेंगळपणा समोर येत असल्याने राष्ट्रवादीचे सदस्य हतबल झाल्याचे चित्र होते. कायद्याला धाब्यावर बसवून केलेले ठराव पहिल्यांदाच सभागृहासमोर आणण्यात विकास आघाडीला यश आले.
सि. स. नं. ३७५७ मधील खेळाच्या मैदानाचे आरक्षण रद्द होण्याच्या विषयावर बरीच खडाजंगी झाली. नगराध्यक्ष पाटील यांनी शहराच्या गरजा आणि कायद्यातील तरतुदी पाहता अवास्तव आरक्षणे टाकून नागरिकांवर पूूर्वीच्या सभागृहाने अन्याय केला आहे. त्यामुळे नागरिकांना गुणवत्तेवर न्याय देऊया, अशी भूमिका मांडली. शहाजी पाटील यांनी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हा विषय तहकूब ठेवावा, अशी मागणी केली. खंडेराव जाधव, विक्रम पाटील, डॉ. संग्राम पाटील, विश्वनाथ डांगे यांनी आरक्षणे उठविण्यासंदर्भात निश्चित धोरण ठरविण्याची सूचना केली. शिवसेनेच्या आनंदराव पवार यांनी आरक्षणे उठविण्यासंदर्भात जे विषय आले आहेत, ते मंजूर करा, अशी सूचना केली.
सुप्रिया पाटील यांनी आरक्षणे उठविण्यासंदर्भात ज्यांचे अर्ज आले आहेत, त्यांना न्याय द्या, अशी भूमिका घेतली. अमित ओसवाल यांनी हा विषय मताला टाकण्याची सूचना केली. प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात समान १२ मते पडल्याने पीठासीन अधिकारी पाटील यांनी नगराध्यक्षाचा अधिकार वापरून प्रस्तावाच्या बाजूने मत देऊन हा विषय मंजूर केला. नगर परिषदेच्या प्रवेशद्वारातील पालिकेतील गाळ्यातील स्वच्छतागृह उद्यापासून नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय झाला. वैभव पवार यांनी ही मागणी केली होती.
अंबिका उद्यानातील व्यायामशाळेचे हस्तांतरण करण्याचे पत्र वैभव पवार यांनी दिले होते. त्यावर विजयभाऊ सेवाभावी संस्थेला भाडेपट्ट्याने इमारत देण्याचा ठराव बेकायदा असल्याने तो ठराव रद्द करून ही इमारत पालिकेच्या ताब्यात घेण्यात यावी, असे निर्देश पाटील यांनी दिले.