फोटो ओळी : शिराळा तहसील कार्यालयात कोरोनाबाबत आढावा बैठकीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : पुन्हा कोरोनाचे संकट आपल्यावर ओढवणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर नियमित करून सुरक्षित अंतर ठेवत सर्व व्यवहार करावेत, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
शिराळा येथील तहसील कार्यालयात आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाविषयी आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. शिराळा प्रांताधिकारी ओंकार देशमुख व तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, कोरोना महामारीशी आपण सक्षमपणे तोंड दिले. या लढाईत आपण आपल्यातील काही लोक गमावलेत. या पूर्वानुभवातून खूप काही शिकलो आहोत. आता कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. त्याचा प्रादुर्भाव कोणत्याही परिस्थितीत वाढू द्यायचा नाही. त्यासाठी आपले सरकार सज्ज आहे. त्याला आपण साथ करायची आहे. शासन स्तरावरून दिलेल्या निर्देशाचे पालन करायचे आहे.
आरोग्य विस्तार अधिकारी डी.एस. चिलवंत यांनी तालुक्यातील कोरोनाचा सद्य:स्थितीची माहिती दिली. तहसीलदार शिंदे यांनी दक्षतेबाबत माहिती सांगितली. गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका कृषी अधिकारी जी.एस. पाटील, मंडळ कृषी अधिकारी सुभाष घागरे, आरोग्य विस्तार अधिकारी डी.एस. चिलवंत व एस.एच. चौगुले आदी उपस्थित होते.