कडेगाव : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, तसेच नगर परिषदांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या सत्तेत आम्हाला सहभाग नकोच आहे. दुष्काळाबाबत गंभीर नसलेल्या सरकारबद्दल जनतेत नाराजी आहे. दुष्काळग्रस्त भागाचा गावनिहाय आढावा घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले. कडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत कदम बोलत होते. डॉ. पतंगराव कदम म्हणाले, दुष्काळी भागाचा गाववार आढावा घेण्याच्या सूचना संबंधित तालुक्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. दुष्काळी भागाचा दौरा करुन तेथील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. दुष्काळाला इतके हलगर्जीपणे घेऊन चालणार नाही. ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनांची वीजबिले राज्याच्या टंचाई उपाययोजना निधीतून भरली पाहिजेत. दुष्काळग्रस्त यादीतून वंचित राहिलेल्या ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांचा समावेश या यादीत झाला पाहिजे. काँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीबाबत माहिती देणेबाबत आ. कदम यांनी टाळाटाळ केली. राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. जनावरांना चारा तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आहे. अशा परिस्थितीत सरकारने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. यासाठी आता कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. यामध्ये सर्वाना सहभागी करुन घेणार असे आमदार पतंगराव कदम यांनी केले. (वार्ताहर)जिल्ह्याचे नेतृत्व : यात नवीन काय?मी अनेक वर्षे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वपूर्ण खात्यांचा सक्षमपणे कार्यभार सांभाळला आहे. काँग्रेसचे जिल्ह्याचे नेतृत्व माझ्याकडे आहे. यात नवीन काय आहे. वर्षानुवर्षे नेतृत्वच करीत आहे, असे पत्रकारांना प्रश्न उत्तर देताना डॉ. पतंगराव कदम म्हणाले.
दुष्काळग्रस्तांचा गावनिहाय आढावा घेऊ
By admin | Published: March 27, 2016 11:32 PM