शेगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई निधीतून जत तालुक्यातील साठवण तलाव भरण्याचे आदेश दिले आहेत. म्हैसाळचे हे पाणी ३१ जुलैपर्यंत सोडले जाणार आहे. केवळ बारा दिवसच बिरनाळ तलावात पाणी सोडण्यात आले. मात्र पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी पाच दिवसांच्या आत कालवा फोडून हे पाणी वळविले आहे. जतला पाणी येण्यासाठी शेतकऱ्यांनाच हा कालवा श्रमदानातून व स्वखर्चातून दुरुस्त करावा लागत आहे. मात्र या शेतकऱ्यांवर स्थानिक शेतकऱ्यांकडून हल्ले होत आहेत. प्रशासनाकडे याबाबत तक्रार करूनसुद्धा दुर्लक्ष होत आहे. कालवा बेकायदेशीररित्या फोडणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करणारे शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांना भेटणार असल्याची माहिती अजिंक्यतारा फाऊंडेशनच्या अॅड. प्रभाकर जाधव यांनी दिली.जाधव म्हणाले की, बनाळी, वायफळपर्यंत सध्या पाणी पोहोचू शकते. कालव्याची अपूर्ण कामे केवळ पाच दिवसांत पूर्ण होऊ शकतात. त्याअगोदर प्रतापपूर, वाळेखिंडी, शेगाव, तिप्पेहळ्ळी हे तलाव म्हैसाळच्या पाणी योजनेतून भरणे गरजेचे आहे. मात्र पश्चिम भागातील शेतकरी कालवा फोडून जत तालुक्याला येणारे हे पाणी अडवून घेतात. आमच्या वाट्याचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. किमान जत उत्तर भागातील तलाव तातडीने भरणे आवश्यक आहे. टंचाई निधीतून कवठेमहांकाळ, मिरज, जत येथील साठवण तलाव भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. कुंभारी, शेगाव आदी गावांसह परिसरातील शेतकऱ्यांनी म्हैसाळच्या पाण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच पैसे भरले आहेत. पाण्याचे नियोजन योग्यरितीने होण्यासाठी कालवे फोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांना भेटणार आहे. (वार्ताहर)
कालवा फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
By admin | Published: July 23, 2014 12:09 AM