जत : जत पोलिस ठाण्यातील हवालदार विजयकुमार दत्तात्रय कोळेकर (वय ४८, रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) याला २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.जत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका फौजदारी गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्याचे आमिष दाखवत काेळेकर याने फिर्यादीकडे ७० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील २० हजार रुपये अफसाना नदीम नदाफ (वय ४४, रा. आर. आर. महाविद्यालयामागे, सांगली रस्ता, जत) या महिलेमार्फत स्वीकारले. त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.मारामारीच्या एका गुन्ह्यात सात संशयितांना जत पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना जमीन मिळवून देण्यासाठी कोळेकर याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. गुन्ह्यातील एका आरोपीला अद्याप अटक व्हायची होती. त्याला अटकपूर्व जामिनासाठी मदत करण्यासाठी ५० हजार असे एकूण रुपये मागितले. यातील २० हजार रुपये अफसानामार्फत स्वीकारले.कोळेकर लाच मागत असल्याची तक्रार गुरुवारी (दि. २६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली. त्यानंतर खातरजमा करून लगेचच जत पोलिस ठाण्यात सापळा लावण्यात आला. ही कारवाई अधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, धनंजय खाडे, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, सीमा माने, प्रीतम चौगुले, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, अतुल मोरे, वीणा जाधव, विठ्ठल राजपूत यांनी केली.
Sangli: जामिनासाठी २० हजारांची लाच घेताना पोलिसासह महिलेला अटक, जत पोलिस ठाण्यात सापळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 2:09 PM