लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर टाकळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध वाहतूक करणारी वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतले. त्यामुळे दूध व भाजीपाल्याचा रस्त्यावर खच पडला होता. आंदोलनप्रकरणी शेतकरी संघटनेच्या पंधरा ते वीसजणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.मिरज पूर्व भागातून दूध व भाजीपाला मिरजेकडे नेण्यासाठी मिरज-सलगरे हा मुख्य रस्ता आहे. पूर्व भागातील टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी, एरंडोली, शिपूर, बेळंकी, सलगरे या परिसरातील दूध व भाजीपाला विक्रीसाठी येणारे व्यापारी, शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या निशाण्यावर आहेत. टाकळी, बोलवाड परिसरातील आंदोलनकर्ते गेल्या दोन दिवसांपासून दूध व भाजीपाला वाहतूक करणारी वाहने अडवून भाजीपाला व दूध रस्त्यावर ओतत आहेत. शनिवारी मध्यरात्री सुमारे चार टन टोमॅटो भरून जाणाऱ्या दोन जीप अडवून आंदोलकांनी टोमॅटो, वांगी, मिरची रस्त्यावर ओतले. तसेच काही वाहनांतील भाजीपाला गावातील ग्रामस्थांना वाटण्यात आला. पोलिस निरीक्षकांनी : गोळा केले टोमॅटोटाकळी अडवा रस्ता येथे आंदोलकांनी सुमारे चार टन टोमॅटो व मिरची, वांगी, कोबीसह इतर भाजीपाला रस्त्यावर विस्कटला होता. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांनी आंदोलकांची समजूत काढली. आंदोलक तेथून निघून गेल्यानंतर जाधव व पोलिसांनी रस्त्यावर पडलेले टोमॅटो टेम्पोत भरले. स्वत: पोलिस निरीक्षक टोमॅटोचे कॅरेट उचलून टेम्पोत भरत असल्याचे पाहून, काही आंदोलकांनीही पहाटेपर्यंत रस्त्यावर विस्कटलेला भाजीपाला व टोमॅटो टेम्पोमध्ये भरून पुढे पाठविला. तीन किलोमीटरपर्यंत दुधाचा पट्टारविवारी सकाळी दुधाचा टँकर बोलवाड येथे अडवून आंदोलकांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले. टँकरच्या टाकीचा व्हॉल्व्ह सोडून दिल्याने सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रस्त्यावर दूध वाहत होते. पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी आला. त्यांनी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आमगोंडा पाटील यांच्यासह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला. आमगोंडा पाटील व आदिनाथ पाटील (रा. टाकळी) यांना अटक केली आहे.
टाकळी, बोलवाडला दूध ओतले
By admin | Published: June 04, 2017 11:30 PM