सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अनेक प्रकारच्या कारवाईचा ससेमीरा मागे लावूनही नशेत वाहन चालविणाऱ्या सांगलीतील तळीरामांच्या संख्येत घट झालेली नाही. गेल्या १६ महिन्यात सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने अठराशे तळीरामांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने या तळीरामांकडून २९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही आकडेवारी थक्क करणारी आहे.सांगली, मिरजेसह जिल्ह्यात पोलिसांची नाकाबंदी होत असे. पण दारुच्या नशेत वाहन चालविणाºया तळीरामांवर कधीच कारवाई होत नव्हती. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी ही कारवाई सुरु केली. तेव्हापासून या कारवाईत अजूनही सातत्य कायम आहे. जिल्ह्यात २५ पोलीस ठाणी आहेत. पण या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांकडून तळीरामांवर फारशी कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक नियंत्रण शाखा तळीरामांवर कारवाई करण्यात अव्वल ठरली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दारुच्या नशेत वाहन हातात असले की, वेगावर नियंत्रण राहत नाही. सुसाटपणे वाहन चालविले जाते. यातून अपघात होतात. तळीराम स्वत:सह दुसºयाचा जीवही धोक्यात टाकतात.दारूच्या नशेत वाहन चालविणाºया तळीरामांना रात्रभर पोलीस कोठडीत ठेवणे, त्यांची दुचाकी जप्त करणे, न्यायालयामार्फत दंड ठोठावणे, त्यांचे ‘लायसन्स’ निलंबित करणे अशा कारवाया करण्यात येत आहेत.‘ब्रेथ अॅनालायझर’ यंत्राची मदतपूर्वी दारुच्या नशेत वाहन चालविणाºया तळीरामांवर कारवाई करताना पोलिसांना खूप कसरत करावी लागत होती. संबंधित तळीरामाच्या रक्त व लघवीची तपासणी करावी लागत असे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करावी लागत असे. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक पळवाटा काढून तळीरामा सहीसलामत सुटायचे. पण ‘ब्रेथ अॅनालायझर’ यंत्रामुळे वाहनाचा चालक दारू पिऊन गाडी चालवत आहे की नाही, हे लगेच जागेवरच समजते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘ब्रेथ अॅनालायझर’ यंत्र वाहतूक पोलिसांसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पुरविण्यात आले आहे.शिक्षेची तरतूदनशेत वाहन चालविल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास न्यायालयाकडून जास्तीत जास्त सहा महिने कारावास किंवा दोन हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे किंवा या दोन्हीही शिक्षा. एखादा याप्रकरणी सापडल्यानंतर पुन्हा तीन वर्षात परत सापडला, तर दोन वर्षे कारावास किंवा दोन हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे किंवा या दोन्हीही शिक्षा आहेत....तर खटला चालविला जातो!तळीराम सापडले की, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. त्यांची दुचाकी जप्त केली जाते. दुसºयादिवशी न्यायालयात खटला पाठविला जातो. तिथे न्यायाधीशांकडून ‘तुम्हाला गुन्हा कबूल आहे का?’, अशी विचारणा केली जाते. ‘कबूल आहे’, असे उत्तर दिले, तर न्यायालयाकडून दंड ठोठावला जातो. ‘गुन्हा कबूल नाही’, असे सांगितले, तर पुढे खटला चालविला जातो.
सांगलीमध्ये ‘तळीराम’ सुसाटच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 11:06 PM