सांगली : शेतजमिनीच्या सातबाऱ्यावरील आणेवारी दुरुस्तीसाठी १५ हजाराची लाच घेताना खेराडेवांगी (ता. कडेगाव) येथील तलाठी मनिषा मोहनराव कुलकर्णी (वय ३७, रा. इस्लामपूर, ता. वाळवा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, सोमवारी रंगेहाथ पकडले.कुलकर्णी या खेराडेवांगीत तलाठी म्हणून काम पाहतात. तक्रारदारांच्या वडिलांची जमीन शासनाने पुनर्वसनासाठी संपादित केली होती. भूसंपादनावेळी सातबारा उताऱ्यावर चुकीची आणेवारी नोंद झाली होती. त्यात दुरुस्ती करावी, यासाठी तक्रारदाराने तलाठी कुलकर्णी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यासाठी कुलकर्णी यांनी तक्रारदाराकडे २० हजाराची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार देण्याचे निश्चित झाले.याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीच पडताळणी करून सोमवारी खेराडेवांगी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून १५ हजाराची लाच घेताना तलाठी कुलकर्णी यांना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूद्ध कडेगाव पोलिसांत ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या कारवाईत पोलिस उपअधिक्षक सुजय घाटगे, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, हवालदार अविनाश सागर, सलीम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, प्रीतम चौगुले, स्वप्नील भोसले यांनी भाग घेतला.
सांगली: सातबारा दुरुस्तीसाठी १५ हजाराची लाच स्वीकारली, महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात
By शीतल पाटील | Published: October 10, 2022 7:16 PM