अवधूत कुलकर्णी-- नेर्ले (ता. वाळवा) येथे नेमणुकीस असलेले तलाठी राहुल काळे गेल्या सहा महिन्यांपासून गावात फिरकलेलेच नाहीत. यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे खोळंबून पडली आहेत. आॅनलाईनच्या नावाखाली तलाठी मात्र आॅफलाईन झाल्याचेच चित्र सध्या दिसत आहे. यामुळे कृष्णा कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, नेर्ले नं. २ सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव कदम यांनी ‘तलाठी दाखवा अन् हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा केली आहे.वाळवा तालुक्यात महसूलच्यादृष्टीने नेर्ले गाव मोठे व दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील तलाठी कार्यालयात एक मुख्य राहुल काळे व एक सहाय्यक सौ. सुनीता पाटील असे दोन तलाठी कार्यरत आहेत. परंतु हे दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून नेर्ले गावात फिरकलेलेही नाहीत. सौ. सुनीता पाटील या काही दिवस रजेवर होत्या. त्या पुन्हा हजर झाल्या. परंतु त्याही आता गैरहजरच आहेत.नेर्ले गाव बागायत असल्याने उतारे, दाखले, जमीन बाब खरेदी, वारस नोंदी करणे आदी विविध कामांसाठी लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालयात तलाठीच नसल्याने ग्रामस्थांच्या दैनंदिन कामकाजाचा घोटाळा होत आहे. आॅनलाईनच्या नावाखाली राहुल काळे व सौ. पाटील आॅफलाईन झाले आहेत.जे तातडीचे दाखले आहेत त्यावर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी येथील कर्मचारी इस्लामपूरच्या वाऱ्या करताना दिसतात. याबाबत आंदोलन छेडू, असा इशारा दिलीप पाटील, वसंतराव कदम यांनी दिला आहे.
आॅनलाईन नावाखाली तलाठी आॅफलाईन
By admin | Published: May 04, 2017 11:57 PM