आेळ : शिराळा तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे जळून खाक झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्हा मार्गाच्या दुतर्फा लावण्यात आलेली झाडे पाण्याविना आणि आगीत जळून खाक झाली आहेत. तर मोठ्या झालेल्या झाडांची जाळी काढून घेतल्याने त्या जनावरांनी फस्त केल्या आहेत. उरलेल्या झाडांची संबंधित विभागाने काळजी घ्यावी, अशी मागणी वनप्रेमींकडून होत आहे.
शिराळा येथील सामाजिक वनीकरण विभागामार्फत शिराळा-मणदूर, शिराळा-गुढे, शिराळा-पाचुंब्री या जिल्हा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडांची रोपे लावण्यात आली आहेत. शासनाच्या देखरेखीखाली असलेल्या या झाडांना वेळेत पाणी पुरवठा न मिळाल्याने त्याची वाढ खुंटली आहे. त्यातच तालुक्यातील सर्व डोंगरांना आगी लागल्याने डोंगर-माळरानावरील गवत जळून ते रस्त्याला येऊन पोचल्याने दोन्ही बाजूला लावण्यात आलेली रोपे यात जळून खाक झाली आहेत. तर काही रोपांना वेळेत पाणी उपलब्ध न झाल्याने ती सुकून गेली आहेत. आग आणि अपुरे पाणी मिळूनही तग धरुन असलेल्या रोपांच्या वरील हजारो जाळी चोरीस गेल्याने हिरवीगार झाडे शेळी, गाय, म्हैस यांसारख्या जनावरांनी खाऊन टाकली असल्याने देखरेखीखालीअभावी शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जी काही रोपे-झाडे उरली असतील त्याची योग्य ती काळजी घेऊन जपणूक करावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून करण्यात येत आहे.