लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज-पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा येथे पाइप कारखान्यातील मजुरांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. झोपेत असलेल्या कामगारांना चाकूच्या धाकाने लुटून नंतर वाटसरूचा मोबाइल काढून घेण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पल्ली गंगाराम काळे, आनंदा रामा काळे (दोघेही रा. मल्लेवाडी, ता. मिरज) आणि अक्षय शहाजी काळे (रा. मालगाव, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून दुचाकीसह ६३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रविवार, दि. ३० मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पंढरपूर रोडवरील तानंग फाटा येथील अजंठा प्रिकास्ट कारखाना येथेही दरोड्याची घटना घडली होती. यात मुलाच्या गळ्याला चाकू लावून कामगारांकडील रोकड व चांदीचे दागिने काढून घेण्यात आले होते. त्यानंतर पंढरपूर रोडवरून जाणाऱ्या वाटसरूचा मोबाइल हिसकावून चोरटे पसार झाले हाेते.
दरोड्यानंतर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या प्रकरणाचा तात्काळ तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीने दोन पथके तयार केली होती. या गुन्ह्याच्या तपासात पथके असतानाच, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना माहिती मिळाली की, चोरी केलेल्या मुद्देमालाची विक्री करण्यासाठी एक जण मिरज येथील टाकळी रोडवर थांबला आहे. गायकवाड यांनी उपनिरीक्षक अभिजित सावंत यांना तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. यावेळी संशयित पल्ली काळे दुचाकीवर थांबला होता. त्याच्याजवळच्या पिशवीत चांदीचे दागिने, चाकू असे साहित्य होते. त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता, साथीदारांच्या मदतीने तानंग फाटा येथे दरोडा टाकल्याची कबुली त्याने दिली.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर गोरे, सचिन कुंभार, शशिकांत जाधव, प्रतीक्षा गुरव, जितेंद्र जाधव, राहुल जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.