भिलवडी : भिलवडी (ता. पलूूस) ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान समितीच्या अध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांत जोरदार वादावादी झाली. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत अध्यक्ष बदलाबाबत मागणी करणाऱ्या बाबूराव ऊर्फ सुभाष शिवाजी पाटील यांना जमावाने पायरीवरून ढकलून दिल्याने खाली पडून ते जखमी झाले. याबाबत त्यांनी भिलवडी पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी नऊजणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भिलवडी ग्रामपंचायतीची नियोजित विशेष ग्रामसभा सरपंच सुरेंद्र वाळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. विविध विषयांवरील चर्चा सुरू असतानाच महात्मा गांधी तंटामुक्त अभियान समितीचे अध्यक्षपद बदला, अशी मागणी बाबूराव पाटील यांनी केली. तसेच या पदावर रमेश पाटील यांची नियुक्ती करावी, असेही सुचविले. ग्रामसभा संपल्यानंतर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास पाटील, पृथ्वीराज पाटील, प्रकाश मगदूम, सनी यादव, प्रमोद पाटील, धनाजी पवार, नौशाद मिर्झा, अमर डिग्रजे, नीलेश पाटील यांनी, ‘तू तंटामुक्तीचा अध्यक्ष बदलण्याचा विषय का काढलास?’ असे विचारून धमकीवजा शिवीगाळ व धक्काबुक्की करीत ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावरून खाली ढकलले. बेसावधपणे खाली पडल्याने बाबूराव पाटील यांचा उजवा पाय दुखावल्याने ते गंभीर जखमी झाले. कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरा भिलवडी पोलिसांत बाबूूराव पाटील यांनी नऊजणांविरोधात फिर्याद दाखल केली. (वार्ताहर)
‘तंटामुक्ती’च्या अध्यक्षपदावरून तंटा
By admin | Published: December 05, 2015 12:32 AM