युनूस शेख ।इस्लामपूर : डोळ्यांनी जन्मत:च अंध, पण जिगर भन्नाट. ज्याच्या तबल्याच्या नादमधूर वादनावर रसिक डोलतात आणि ढोलकीच्या कडकडाटात भान हरपून जातात, अशा ढोलकीपटू नंदकुमार कुडाळकर या कलाकाराची ढोलकीवरील थाप कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये थबकली आहे. त्याचवेळी आठ महिन्याच्या तान्ह्या बाळासाठी त्याचा जीवसुद्धा व्याकुळ झाला आहे.
नंदकुमार भानुदास कुडाळकर हा ३७ वर्षांचा अंध ढोलकीपटू, मूळचा पुरंदर तालुक्यातील वीर गावचा रहिवासी आहे. मात्र तबला आणि ढोलकीवर त्याची बोटे थरारली, ती पहिल्यांदा सांगलीत वसंत गाडेकर या उस्तादांकडे. कोल्हाटी समाजातील वादनाची परंपरा उपजतच नंदूच्या अंगात भिनली होती. त्यामुळे हार्मोनियम वाजविणाऱ्या वडिलांनी त्याला सांगलीत गाडेकरांकडे वादनाचे धडे घेण्यासाठी पाठविले. वयाच्या सातव्या वर्षापासून नंदू तबला आणि ढोलकीच्या संगतीने रंगमंचावर अनेक मैफिली गाजवत आला आहे.
पण सध्या लॉकडाऊनमुळे त्याच्या कुटुंबांच्या जगण्याची धडपड सुरू झाली. घरी वृद्ध आई-वडील, तीन अंध-दिव्यांग बहिणी, भाची, पत्नी आणि दोन मुले, त्यामध्ये आठ महिन्याचे तान्हे बाळ, अशा १० जणांच्या पालन-पोषणाची जबाबदारी अंध नंदूवर आहे. दोन महिन्यांपासून मोठी आर्थिक कुचंबणा झाली आहे. नृत्य दिग्दर्शिका हेमसुवर्णा मिरजकर यांनी मदत पुरविली असून, त्यावरच या कुटुंबाची गुजराण सुरू आहे. ढोलकी वाजली तरच चार पैसे मिळून कुटुंबाची गुजराण करणारा नंदू परिस्थितीपुढे हतबल झाला आहे. वादनाचा शिकवणी वर्ग बंद असल्याने खायचेही वांदे झाले आहेत.
बाळासाठी त्याचा जीव तीळ तीळ तुटतोय. अनेक स्पर्धा जिंकणाºया आणि मैफिली गाजविणाºया नंदूवर आता तबला आणि ढोलकीकडे बघत बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नंदूच्या कुटुंबात त्याच्यासह तीन बहिणी अंध आणि दिव्यांग आहेत. त्यांचे शासकीय दाखले आहेत. कलाकार म्हणूनही नंदूच्या कलेची दखल शासनाने घेतलेली नाही.
या गुणी कलाकाराला संगीतप्रेमी दानशूर व्यक्ती, संस्था यांनी मदत करावी, अशी आर्त हाक नृत्य दिग्दर्शिका, निवेदिका हेमसुवर्णा मिरजकर आणि तालबहाद्दर अनंत पांचाळ यांनी ‘लोकमत’कडे दिली.