सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे दगडू नाना चव्हाण (वय ६७) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारीचा चालक अॅड. सचिन सुभाष गुजर (वय ४३, रा. सोमवार पेठ, तासगाव) यास आज (सोमवार) सकाळी सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अपघातानंतर तो फरारी झाला होता. कवलापुरातील तासगाव रस्त्यावरील खाडिलकर मळ्याजवळ चव्हाण यांचा उकिरडा आहे. शुक्रवारी सायंकाळी ते शेण टाकण्यासाठी निघाले होते. त्यावेळी गुजर सांगलीहून तासगावला मोटारीने (क्र. एमएच ०४ वाय ८७६०) भरधाव निघाला होता. खाडिलकर मळ्याजवळ ओव्हरटेक करीत असताना त्याचा ताबा सुटल्याने मोटारीने चव्हाण यांना जोराची धडक दिली होती. यामध्ये ते उडून पडले. त्यानंतर मोटार रस्त्याकडेला विजेच्या व दूरध्वनी खांबावर जाऊन आदळली होती. दूरध्वनी खांब वाकल्याने तो चव्हाण यांच्या डोक्यात पडला होता. यामध्ये चव्हाण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर गुजरने मोटार तिथेच सोडून पलायन केले होते. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघातग्रस्त मोटार जप्त करण्यात आली होती. मोटारीच्या क्रमांकावरून गुजरचे नाव निष्पन्न झाले होते. सोमवारी सकाळी त्याला अटक केली. (प्रतिनिधी)
तासगावच्या फरारी वकिलास अटक
By admin | Published: July 15, 2014 12:53 AM