तासगाव : तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सोमवारी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. खासदार संजयकाका पाटील यांच्या आदेशानुसार राजीनाम्याचा निर्णय झाला असून, आता नव्या नगराध्यक्षांची उत्सुकता आहे. नगरसेवक अविनाश पाटील यांचे नाव आघाडीवर असून, शरद मानकर आणि अनिल कुत्ते यांच्या नावांचीही चर्चा आहे.तासगाव नगरपालिकेत महिन्याभरापासून नगराध्यक्ष निवडीवरुन राजकीय नाट्य सुरु होते. तत्कालीन नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा द्यावा, यासाठी काका गटातीलच नगरसेवकांनी मोहीम उघडली होती. काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत, आम्हालाही संधी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र पाटील यांचा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरदेखील राजीनामा झाला नसल्याने नगरसेवकांत उलट-सुलट चर्चा होती. अखेर खासदार संजयकाका पाटील यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष पाटील यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.पाटील यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे. पालिका निवडणुकीला अद्याप नऊ महिन्यांचा अवधी आहे. या काळात आणखी कोणाला किती महिन्यांची संधी मिळणार? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र चार, पाच नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदाची इच्छा संजयकाकांकडे व्यक्त केली आहे. आता खासदार संजयकाका कोणाला संधी देणार? याची उत्सुकता आहे. इच्छुकांत नगरसेवक अविनाश पाटील, शरद मानकर, अनिल कुत्ते, रजनीगंधा लंगडे यांच्या नावांची चर्चा आहे. यापैकी अविनाश पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. (वार्ताहर)
तासगाव नगराध्यक्षांचा राजीनामा
By admin | Published: April 25, 2016 11:31 PM