तासगाव : तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनी अखेर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. उपनगराध्यक्ष सारिका कांबळे यांनीही राजीनामा दिला आहे. नव्याने उपनगराध्यक्ष पदासाठी शिल्पा धोत्रे यांचे नाव अंतिम समजले जात आहे, तर नगराध्यक्ष पदासाठी अनिल कुत्ते यांचे नाव आघाडीवर असले तरी, राजू म्हेत्रे यांच्या नावाचीही चर्चा आहे. तासगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून महिन्यांचे नगराध्यक्षपद दिवसांवर आले आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर राजीनामा देणारे अविनाश पाटील हे तिसरे नगराध्यक्ष ठरले आहेत. अविनाश पाटील राजीनामा देणार की नाही? याची कुजबूज सुरु होती. त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी इच्छुकांकडून खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे जोरदार फिल्डिंग लावली जात होती. नगरपालिकेचा उर्वरित कालावधी अवघ्या तीन महिन्यांचा राहिला आहे. या काळात नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी, यासाठी अनिल कुत्ते, जाफर मुजावर, राजू म्हेत्रे, शरद मानकर यांची नावे इच्छुकांच्या यादीत होती. खासदार संजयकाका पाटील यांच्या आदेशानुसार मंगळवारी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला. त्याचबरोबरच उपनगराध्यक्षा सारिका कांबळे यांनीही राजीनामा दिला. यापूर्वी उपनगराध्यक्ष निवडीत डावलल्याने नाराज असलेल्या शिल्पा धोत्रे यांची उपनगराध्यक्ष पदावर वर्णी निश्चित मानली जात आहे.नगराध्यक्ष पदाच्या काळात शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावता आल्याचे समाधान मावळते नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे काम, मूर्तीचे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करता आला. पालिकेची प्रशासकीय इमारत, पाणी योजना टप्पा क्रमांक तीनचे काम, स्मशानभूमीला जोडणाऱ्या कॉज वेचे काम, शवदाहिनीचे काम मार्गी लावण्यात यश मिळाले. शहरासाठी अत्यंत उपयोगी ठरणारी शववाहिका एका बँकेच्या सहकार्याने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले. बायपास पूर्णत्वास आणण्यासाठी पाठपुरावा करता आला. नुकतेच खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नातून पाणी योजनांच्या मीटरसाठी दोन कोटींचे अनुदान मिळवता आले. यासह पालिकेची बहुतांश रखडलेली विकासकामे नगराध्यक्ष पदाच्या कालावधित मार्गी लावल्याचे समाधान अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)इच्छुकांची फिल्डिंग : नेत्यांकडून गोपनीयतानगराध्यक्ष पदासाठी अनिल कुत्ते यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र नगरसेवक राजू म्हेत्रे यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. या निवडीच्या निमित्ताने पडद्याआड पुन्हा एकदा लॉबिंग सुरु आहे. मात्र अंतिम निर्णय खासदार संजयकाकांच्या हातात असल्याने, कोणाची वर्णी लागणार हे खासदारांच्या भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे.
तासगाव नगराध्यक्षांचा राजीनामा
By admin | Published: August 30, 2016 11:20 PM