तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणूक काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी केली. येथे काँग्रेस भवनमध्ये आयोजित मेळाव्यात कदम बोलत होते. यावेळी भाजपमधून अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील, शैलजा पाटील, सत्यजित देशमुख, महादेव पाटील, आनंदराव मोहिते, मालन मोहिते, डॉ. नामदेव कस्तुरे, सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कदम म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. खऱ्याअर्थाने काँग्रेस पक्षच विकास घडवून आणू शकतो, याची जनतेला खात्री पटली आहे. जिल्ह्यातील पाणी योजना चालविण्यात भाजपचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तासगाव तालुक्यात व शहरात भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसच प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपला रोखण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्ये आहे. येणारी नगरपालिका निवडणूक स्वबळावर जिंकण्यासाठी महादेव पाटील यांच्यामागे जिल्ह्यातील काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी राहील. सदाशिवराव पाटील यांनी, तासगाव पालिकेच्या गैरकारभाराविरोधात महादेव पाटील करीत असलेल्या आंदोलनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, आपण योग्य रस्त्यावरून जात आहात. हाच रस्ता तासगाव पालिकेच्या सत्तेपर्यंत घेऊन जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार पारदर्शक असावा लागतो. त्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनमानावर होत असतो. त्यामुळेच तासगावची जनता निश्चितच काँग्रेसला साथ देईल. पाच वर्षापूर्वी तासगाव तालुक्यात काँग्रेसची अवस्था दयनीय होती. काँग्रेस भवन विरोधकांच्या ताब्यात होते. त्यावेळेपासूनच्या महादेव पाटील यांच्या संघर्षाचा आपण साक्षीदार आहोत.यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शैलजा पाटील, सत्यजित देशमुख, आनंदराव मोहिते, मालन मोहिते, ज्येष्ठ नेते गजानन कुत्ते, सतीश पाटील, रवींद्र साळुंखे यांनीही मार्गदर्शन केले. महादेव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी येळावीचे माजी सरपंच जालिंदर साळुंखे, भानुदास चव्हाण, एकनाथ जाधव, हनुमंत चव्हाण, प्रकाश सूर्यवंशी, संजय पवार, नेताजी घाटगे, नंदू मंडले, फारूक हाकिम, पंकज पाटील, संगम शिंदे, संताजी पाटील, निवास पवार, संभाजी सूर्यवंशी, नीलेश पाटील, अरुण पाटील, चंद्रकांत पाटील, हणमंत अडसूळ उपस्थित होते. वल्लभदास शेळके यांनी आभार मानले. (वार्ताहर)भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशया कार्यक्रमात भाजपचे बबन धनवडे, महादेव म्हस्के, आनंदराव धनवडे, शेकापचे अमर पाटील, निवास मानुगडे, श्रीकांत धाबुगडे, दत्ता माईणकर, सुनील गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
तासगाव नगरपालिका स्वबळावर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2016 11:45 PM