तासगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादीचे ७ तर भाजपचे ५ सदस्य आहेत. सध्या सभापतीपदाचे आरक्षण सर्वसाधारण आहे. शेवटच्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येकी ८ महिने याप्रमाणे तिघांना सभापतीपदाची संधी देण्यात येणार होती. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून संजय जमदाडे हे आमदार सुमन पाटील, सुरेश पाटील, रोहित पाटील यांच्या माध्यमातून कमल पाटील यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी पाठपुरावा करीत होते. मात्र त्यांची मागणी गांभीर्याने घेतली गेली नाही. शिवाय कमल पाटील यांना एकट्याला अनेक महिने सभापतीपदाची संधी दिल्याने इतर सत्ताधारीही नाराज होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारी होणाऱ्या मासिक बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
कमल पाटील यांच्या राजीनाम्यासाठी उपसभापती डॉ. शुभांगी पाटील, संजय जमदाडे, मनीषा माळी, मायाताई एडके, बेबीताई माळी एकवटले. मासिक बैठकीच्या दिवशी हे सर्व जण उपसभापतींच्या दालनात बसून होते. तर संभाजी पाटील हे पंचायत समितीत येऊन परत गेले. दुपारी १ वाजता मासिक बैठक होणार होती. बैठकीला सत्ताधारी सदस्य गेलेच नाहीत. १ वाजून १० मिनिटांनी सर्व सत्ताधारी सदस्य पंचायत समितीतून बाहेर पडले. त्यामुळे कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली. यानिमित्ताने सभापती कमल पाटील यांच्या विरोधात सत्ताधारी सदस्यच एकवटल्याचे दिसून आले.
चाैकट
राजीनाम्यास टाळाटाळ
याबाबत संजय जमदाडे म्हणाले, सुरुवातीला पुरुष सदस्यांना डावलून कमल पाटील यांना या पदावर काम करण्याची संधी दिली होती. पक्षनेतृत्वाने त्यांना ८ महिन्यांचा कालावधी ठरवून दिला होता. उर्वरित १६ महिन्यांच्या कालावधीत मला व संभाजी पाटील यांना संधी देण्यात येणार होती. तसे आमदार सुमन पाटील, जिल्हा बँकेचे सदस्य सुरेश पाटील व रोहित पाटील यांच्यासमोर ठरलेही होते. मात्र, कमल पाटील यांना ठरवून दिलेला ८ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतरही त्या राजीनामा देत नव्हत्या.