तासगाव : तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वामी रामानंद भारती सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली. राष्ट्रवादीसह भाजप, काँग्रेससह अन्य अपक्ष उमेदवारांनी बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतले. जेवढ्या जागा, तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा पंडितराव यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यामुळे बिनविरोधच्या प्रक्रियेकडे लक्ष लागून राहिले होते.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सूतगिरणीची स्थापना केली होती. तेव्हापासून सूतगिरणीची निवडणूक बिनविरोधच झालेली आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेले अर्ज यामुळे या निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. एकूण १७ जागांसाठी ११३ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी भाजपचे २५, तर काँग्रेस आणि इतर अपक्षांचे ६ अर्ज होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंंदे, आमदार सुमनताई पाटील यांनी पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेत नाराजांची समजूत काढली. खासदार संजय पाटील यांच्याशीदेखील बिनविरोधसाठी विनंती करण्यात त्यांनीही राष्ट्रवादीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता आमदार सुमनताई पाटील यांनी संभाव्य संचालकांची नावे जाहीर केली. त्यानंतर शेवटच्या तासाभरात अन्य इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्यासाठी सहायक उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात आमदार सुमनताई पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंंदे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.संचालकपदी बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे- कापूस उत्पादक गट (अ वर्ग) : आमदार सुमनताई रावसाहेब पाटील, राजाराम नाभिराज पाटील, मारुती बाबूराव पवार, सिध्दगौंडा रघुनाथ पाटील, विलास निवृत्ती पाटील, मारुती पांडुरंग पाटील, बाळासाहेब भीमराव देशमुख, पांडुरंग हंबीरराव पाटील, निवास मारुती पाटील.कापूस उत्पादक गट - (ब वर्ग) : आनंदराव धोंडिराम पाटील, संजय राजाराम यादव, सुनील भानुदास पाटील. अनुसूचित जाती-जमाती : विलास धोंडिराम खाडे. महिला गट - विजया तुकाराम कुंभार, मंगल रामराव पाटील. इतर मागास प्रवर्ग : यासीन नूरजमाल मुल्ला. भटक्या विमुक्त जाती जमाती - रंगराव धोंडिराम धोत्रे. (वार्ताहर)आर. आर. आबांची ही संस्था असून, त्यांच्या पश्चात ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन खासदार संजयकाका यांना केले होते. त्यांनी आमची विनंती मान्य केली. सूतगिरणीप्रमाणेच तासगाव बाजार समितीसाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षातील वरिष्ठ नेते एकत्रितपणे निर्णय घेतील.- विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी. सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्यामुळे आणि राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमुळे सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारांची निवड करताना सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. सर्वानुमते निर्णय झाल्यामुळे कोणीही नाराज नाही. यावेळी ग्रामीण भागाला संधी देण्यात आली असून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. - आमदार सुमनताई पाटील‘लोकमत’चा अचूक अंदाज सूतगिरणीसाठी भाजपकडून अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र भाजपकडून बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दबावतंत्राचा वापर करण्यासाठीच सूतगिरणीत अर्ज दाखल केले असून, ऐनवेळी भाजप माघार घेईल, त्यामुळे सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध होईल, असा अंदाज ‘लोकमत’ने वर्तवला होता. तो अचूक ठरला.नव्या चेहऱ्यांना संधी सूतगिरणीसाठी यावेळी विद्यमान अध्यक्ष राजाराम पाटील आणि संचालक संजय यादव यांचा अपवाद वगळता, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, त्यामध्ये आमदार सुमनताई पाटील यांचाही समावेश आहे. याचवेळी पक्षातील गटबाजी असणाऱ्या गावांतील इच्छुकांनाही वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
तासगाव सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध
By admin | Published: July 08, 2015 11:57 PM