दत्ता पाटील - तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत अखेरपर्यंत चर्चा सुरु होती. मात्र कार्यकर्त्यांचा स्वबळाचा अट्टाहास आणि नेत्यांची वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा, यामुळे आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात आला नाही. दोन्ही पक्षांनी स्वबळ ‘दाखविण्या’चा निर्णय घेतला. त्यामुळे तासगाव बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपच्या वर्चस्वासाठीचा आखाडाच ठरणार, हे मंगळवारच्या घडामोडीवरुन निश्चित झाले असून, काँग्रेसनेही आपले अस्तित्व दाखविण्यासाठी दंड थोपटले आहेत. तसेच चोवीस वर्षांपासूनचा बिनविरोधचा पायंडा यावेळी मोडीत निघाला आहे.तासगावची सूतगिरणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे नेते खासदार संजय पाटील यांनी सहकार्य केले. त्यामुळे बाजार समितीची निवडणूकही बिनविरोध होणार, या चर्चेने वेग घेतला होता. त्यापध्दतीने तालुक्यात घडामोडी सुरु होत्या. शेवटच्याच दोन दिवसात दोन्ही पक्षांत आघाडीबाबत जोरदार खलबते सुुरु होती. अगदी अर्ज मागे काढण्याच्या शेवटच्या दोन तासापर्यंत आघाडी करण्याचे गुऱ्हाळ सुरु होते. काँग्रेससोबतही चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. मात्र कोणत्याही पक्षाची आघाडी होणार नसल्याचे, मंगळवारी दुपारी बारा वाजता उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट झाले. सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांचा स्वबळाचा अट्टाहास आणि नेत्यांची वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा यामुळे बाजार समिती निवडणुकीचा बिनविरोधचा पायंडा यावेळी मोडीत निघाला. जागा वाटपात सन्मानजनक तोडगा न निघाल्यामुळेच आघाडीचा फॉर्म्युला गुंडाळण्यात आला. बाजार समितीच्या बहुतांश संस्थांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्यामुळे भाजपला जादा जागा देण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नकार दिला. भाजपकडे सत्तेची ताकद असल्यामुळे आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाराजांची ताकद भाजपसोबत असल्याचे दिसून आल्यामुळे भाजपनेही कमी जागांवर तडजोड करण्यास नकार दिला, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीबाबत झालेल्या चर्चेतही तोडगा निघाला नाही.राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांना तालुक्यात आपलेच वर्चस्व असल्याचे जागा वाटपाच्या चर्चेतून जाणवत होते.त्यामुळेच तडजोडीचा फॉर्म्युला यशस्वी झाला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरूनच तालुक्यातील ग्रामपंचायती, सहकारी सोसायट्यांवर कोणाचे वर्चस्व आहे, हे दाखवून देण्याचा अप्रत्यक्ष इशाराच दोन्ही पक्षांनी देत शेवटच्या क्षणी याद्या जाहीर केल्या. त्यामुळे बाजार समितीच्या आखाड्यात तालुक्यावर कोणाचे वर्चस्व राहणार? हे ठरणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार, हे निश्चित आहे.काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादीतून.. राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपमधून...काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, येळावीचे विजयअण्णा पाटील यांच्या पत्नी रंजना पाटील यांना राष्ट्रवादीने सोसायटी गटातून महिला प्रवर्गातून उमेदवारी देऊन बेरजेचे राजकारण केले आहे, तर पूर्वी राष्ट्रवादीत असणारे सावळजचे उपसरपंच अनिल थोरात यांना ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून उमेदवारी देऊन भाजपने बेरजेचे राजकारण केले आहे.काँग्रेसची अस्तित्वाची लढाई काँग्रेसने प्रक्रिया गट वगळता अन्य १८ जागांवर उमेदवार उभा करून स्वतंत्र पॅनेल उभा करून राष्ट्रवादी आणि भाजपसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेससाठी राजकारणात अस्तित्वाची लढाई ठरणार असून, तिरंगी लढतीमुळे निवडणुकीचे चित्र रंगतदार झाले आहे.
तासगावमध्ये वर्चस्वाची लढत
By admin | Published: July 16, 2015 12:18 AM