तासगाव :
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. पिण्याच्या आणि शेतीच्या सर्व पाणी योजनांची कामे तातडीने मार्गी लावा, अशा सूचना पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा आणि उपसा सिंचन योजनांच्या कामाचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. बैठकीला आमदार सुमन पाटील, सुरेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे, सचिन पवार, अभिनंदन हरुगडे, श्रीमती ज्योती देवकर उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, उपसा सिंचन योजनेची कामे दर्जेदार करावीत. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी येत्या पावसाळ्यात पुराच्या पाण्याने तलाव, विहिरी भरून घेण्यासाठी व्यवस्था करावी.
बैठकीला कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के, टी. व्ही. पाटील, जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, विश्वास पाटील, दादासाहेब कोळेकर, महेश पवार उपस्थित होते.
चौकट : तासगाव - कवठेमहांकाळमधील ही कामे मार्गी लागणार
विसापूर - पुणदी योजनेला मुबलक पाणी
गौरगाव, कौलगे, वाघापूर, खुजगाव, बलगवडे, डोर्ली गावातील वंचित क्षेत्र सिंचनाखाली येणार
येरळा नदीचा ताकारीच्या लाभक्षेत्रात समावेश करून पात्रातील बंधारे भरणार
आगळगाव उपसा सिंचन योजना लवकरच पूर्ण होणार
ढालगाव, नागज, कुंडलापूर, गर्जेवाडी, तिसंगी, वाघोली, घाटनांद्रेसह घाटमाथ्यावरील टेंभू योजनेची कामे मार्गी लागणार
अलकुड एक, शिंदेवाडी (घो), चुडेखिंडी भागातील टेंभूचे काम लवकरच पूर्णत्वास
म्हैसाळ व टेंभू योजनेच्या पोटकालव्यांची कामे लवकरच पूर्ण होणार.
विस्तारित गव्हाण योजनेतून बोरागाव (ता. कवठेमहांकाळ)चा तलाव भरणार.
जाखापूर-केरेवाडी गावे सिंचनाखाली.
चौकट
सावळजसह आठ गावे टेंभू योजनेत
तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आठ गावे कोणत्याच योजनेत समाविष्ट नव्हती. या गावांचा टेंभू योजनेत समावेश व्हावा, यासाठी आमदार सुमन पाटील यांनी तत्कालीन भाजप सरकारकडे पाठपुरावा केला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये जलसंपदामंत्री पाटील यांनी सावळजसह आठ गावांचा टेंभूच्या पाचव्या टप्प्यात समावेश करणार असल्याचे वचन अंजनीत स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात दिले होते. हे वचन पूर्ण केले असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. ही आठ गावे टेंभूच्या लाभक्षेत्रात समाविष्ट आहेत. कामाच्या निविदा जून महिन्यात काढण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.