तासगाव : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने डोंगर आणि शेती जिवंत करा व आपल्या भागातील दुष्काळावर मात करा, असे स्पष्ट करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी बांध-बंदिस्तीचे व शेततळ्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे, असे मत पानी फौंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी व्यक्त केले. स्पर्धेत तासगाव तालुक्यातील ४९ गावांनी सहभाग दाखवला असून, आपले गाव पाणीदार करण्याचा निर्धार यावेळी केला.तासगाव तहसील कार्यालयाच्यावतीने येथील बहुउद्देशीय हॉल येथे पानी फौंडेशन संचलित वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या तासगाव तालुक्यातील ४९ गावांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण आणि कार्यशाळेत डॉ. अविनाश पोळ बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी अरुण जाधव, सहायक निबंधक शंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे, श्री. ननावरे आदी उपस्थित होते.वॉटर कप स्पर्धेत तासगाव तालुक्यातील ४९ गावांनी सहभाग दाखवला आहे. याच गावांपैकी चिखलगोठण येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील यांच्यासह प्रशिक्षण केलेल्या लोकांशी डॉ. अविनाश पोळ यांनी थेट सुसंवाद साधला.डॉ. पोळ म्हणाले, गावामध्ये एकजुटीने काम केल्यास गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. गावच्या लोकसंख्येच्या दुप्पट रोपे लावणे आवश्यक आहे. चिखलगोठण येथील मंडळींनी पाच हजार रोपे लावली आहेत. प्रतिमाणसी ६ घनमीटर काम होणे आवश्यक आहे; नाही तर आपला भाग काही वर्षांत वाळवंटाकडे जाऊ शकतो. यासाठी आपल्या शेतातील माती वाहून जाणार नाही, हे डोळ्यासमोर ठेवून माती टिकण्यासाठी बांध-बंदिस्तीचे काम प्राधान्याने होणे आवश्यक आहे. तसेच शेतात पडणारे पाणी त्याच भागात जिरवले तर, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होईल.तसेच काही कामांसाठी भारतीय जैन संघाच्यावतीने २५० तास पोकलॅन व जेसीबी दिला जाणार असून यासाठी डिझेलचा खर्च फक्त गावाने करावयाचा आहे. वॉटर स्पर्धा ही आनंद यात्रा समजून यश मिळवावे व आपले गाव पाणीदार करावे, असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले.
यावेळी डॉ. विकास खरात यांनी, शासनाने चार वर्षांपूर्वी जलयुक्त योजना सुरू केली आहे. आज पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी केवळ २० टक्केच पावसाचे पाणी उपयुक्त ठरत आहे अन्यथा ८० टक्के पाणी वाया जात आहे. हे वाया जाणारे पावसाचे पाणी आपल्या भागातच मुरवले, तर दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही असे सांगितले. जलयुक्त शिवार योजनेसाठी लोकचळवळ महत्त्वाची आहे असे सांगून, डॉ. खरात म्हणाले, तालुक्यातील १४२६ शौचखड्ड्यांना मान्यता दिली असून त्याचे पैसे येत्या आठवड्यात खात्यावर जमा होतील.
तालुका कृषी अधिकारी आर. बी. श्ािंदे यांनी, तालुक्यात गाळ काढण्याचे काम लवकरच सुरू होत आहे असे सांगून, जिल्ह्यात सर्वाधिक शेततळी तालुक्यात झाली असल्याचे सांगितले. ननावरे यांनी, चांगल्या अधिकाºयांचा फायदा करून घ्यावा असे सांगून, योग्य नियोजन करावे, असे सांगितले. तहसीलदार सुधाकर भोसले यांनी प्रास्ताविकात, या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांनी काम कसे करावे, नियोजन कसे करावे याची माहिती विषद क रून, पाण्यासाठी एकजुटीने काम केल्यास येथील दुष्काळ कायमस्वरूपी हटविण्यास मदत होईल असेही सांगितले. तसेच गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार याबाबतची माहितीही तहसीलदारांनी दिली.यावेळी तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत ४९ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीसपाटील उपस्थित होते.