लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळी सुटीतील लाभ डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बचत खात्यावर जमा करण्याबाबत शिक्षण संचालकांनी आदेश काढला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बँकेत विद्यार्थ्यांचे खाते उघडणे अडचणीचे असल्याचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना शिक्षक संघाच्यावतीने देण्यात आले.
शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने राज्याच्या शालेय पोषण आहार विभागाच्या उपसंचालिका पद्मश्री तळदेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या विद्यार्थी व पालकांनी बँकेमध्ये जाणे सुरक्षित नाही, शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोळा करण्यामध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत, यापूर्वी गणवेशाचे पैसे वर्ग करण्यासाठी विद्यार्थ्यांची बचत खाती काढण्यात आली होती. त्यावर एकाच वर्षाच्या गणवेशाचे पैसे वर्ग करण्यात आले. त्यानंतर शासनाकडून कोणतीही रक्कम वर्ग न केल्यामुळे पालकांमध्येही खाती काढण्यामध्ये उदासीनता असल्याचे उपसंचालकांच्या निदर्शनास आणून दिले. शालेय पोषण आहाराबाबतचा आदेश केंद्राचा असल्याने त्यातील अडचणी केंद्र शासनाकडे कळवल्या जातील. याबाबतची सूचना वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच शाळांना कळवल्या जातील, अशी ग्वाही दिली.
शिक्षक संघाच्या शिष्टमंडळात विनायक शिंदे, अविनाश गुरव, पोपटराव सूर्यवंशी, हंबीरराव पवार, तानाजी खोत, अरुण पाटील, महादेव पवार यांचा समावेश होता.