दत्ता पाटील ।तासगाव : तालुक्यात पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतून दुष्काळ मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. गावागावातील दुष्काळ हटवण्यासाठी लोकांनी चंग बांधला आहे. जनतेच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यातील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंबर कसून काम सुरु केले आहे. मात्र खासदार, आमदारांसह तालुक्यातील लोकप्रतिनिधींची मात्र उदासीन भूमिका असल्याने जनतेत रोष आहे.
तासगाव तालुक्यात पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत ४९ गावांनी सहभाग घेतला. मात्र स्पर्धा सुरु होण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण केले नसल्यामुळे २० गावे स्पर्धेतून बाहेर पडली. तालुक्यात सद्यस्थिती २९ गावांत पाणी फौंडेशनचे काम मोठ्या उत्साहाने सुरु आहे. प्रत्येक गावात लोक स्वयंस्फूर्तीने श्रमदान करण्यासाठी सहभागी होत आहेत. स्पर्धेच्या निकषानुसार काम करण्यासाठी अहोरात्र कार्यरत दिसत आहेत.
पानी फौंडेनशच्या कामाने प्रेरित होऊन तासगाव शहर, सांगली, मिरज शहरातील नागरिकही या गावांतील कामात सहभाग घेत आहेत. कोणी श्रमदान करून, तर कोणी आर्थिक मदत करून या कामाला चालना देत आहे.दुष्काळाचे उच्चाटन करण्याच्या हेतूने सुरु असलेल्या या स्पर्धेत काम करण्यासाठी लोकांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर एक पाऊल पुढे टाकून तालुक्यातील प्रशासनाचे काम सुरु आहे. केवळ प्रशासकीय कामच नव्हे, तर गावागावात जाऊन श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
केवळ घड्याळी तास मोजून नोकरी करणाºया प्रवृत्तीसमोर नवा आदर्श ठेवून आॅनड्युटी चोवीस तास काम करुन जनतेशी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी अरुण जाधव, तालुका कृषी अधिकार आर. बी. शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी गावे पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. अधिकाºयांच्या उत्साहाने तालुक्यातील जनताही प्रेरित झाली आहे.एकीकडे प्रशासन दुप्पट कार्यक्षमतेने दुष्काळ मुक्तीच्या मोहिमेत सहभागी झाले असताना, दुसरीकडे तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्यात लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र आहे. २९ गावात पानी फौंडेनशचे तुफान आले आहे. अनेक संघटनांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र खासदार आणि आमदारांनी मात्र अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील पाणी योजनांसाठी श्रेयवाद घेताना नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून चढाओढ केल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. मात्र पानी फौंडेशनसाठी पुढाकार घेण्यात चढाओढ दूरच, सहभागदेखील नामधारी दिसून येत आहे.तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व करणाºया कारभाºयांचीही पानी फौंडेशनच्या कामात उदासीन भूमिका आहे. अपवाद वगळता बहुतांश कारभाऱ्यांचा या कामात सक्रिय सहभाग नाही. सहभाग घेतलाच, तर दिखावू स्वरुपाचाच असतो. एरव्ही कामांचा ठेका आणि ठेकेदारीसाठी सरसावणारे कारभारी पानी फाऊंडेशनच्या कामात केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहेत. २२ मे पर्यंत वॉटर कप स्पर्धा आहे. या कालावधित किमान येणाºया काळात लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेऊन तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.मुंबईच्या आमदारांचा तासगावात पुढाकारमंबई येथील आमदार योगेश सागर यांनी तासगाव तालुक्यातील बस्तवडे आणि सावळज ही दोन गावे पानी फौंडेशनसाठी दत्तक घेतली आहेत. वास्तविक जिल्ह्याशी कोणताही संबंध नसतानादेखील केवळ सामाजिक बांधिलकी जोपासत आमदार सागर यांनी या दोन गावात स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून जलसंधारणाच्या कामासाठी यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. तर बीजेएस संस्थेच्या माध्यमातूनही दुष्काळमुक्तीसाठी तालुक्यातील १४ गावात यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.