सांगली : राज्य शासनाने महिलांना एसटी तिकीट दरात ५० टक्के सवलत दिल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांचे नुकसान झाले आहे. प्रवाशांनी या वाहनांकडे पाठ फिरवली आहे. शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ टॅक्सी-मॅक्सी कॅब पंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना अनुदान द्या, डिझेलमध्ये अनुदान द्या अन्यथा आमची वाहने शासन दरबारी जमा करुन सरकारी नोकऱ्या द्या अशी मागणी आंदोलकांनी केली.
याबाबत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, शासनाने एसटीत महिलांना तिकीटदरात ५० टक्के सूट दिली. ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरु केली. याबाबत शासनाने खासगी व्यवसायातील संघटनेला विश्वासात घेतले नाही. शासनाच्या या निर्णयामुळे खासगी व्यावसायिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
प्रवाशांनी या वाहनांकडे पाठ फिरवल्याने व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे शासनाने निर्णय बदलावा. शासन ज्याप्रमाणे एसटीला अनुदान देते, त्याप्रमाणे खासगी वाहनांनाही अनुदान मिळावे, डिझेलमध्ये अनुदान देण्यात यावे. सरकारचे कर, पासिंग मोफत करावेत, बारा प्रवाशांचा परवाना देण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणापासून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मजगी, उदयसिंह घोरपडे, परशुराम नरुटे, अंकुश खरात, रवींद्र निकम, शिवाजी घुगरे, दाजी गडदे, मारुती लोखंडे, दीपक मोटे, निवांत आटपाडकर, रमजान नदाफ, सुनील पवार यांच्यासह वाहनचालक, मालक सहभागी झाली होते.