पुनवत : दोन महिन्यांपूर्वी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत काम केलेले शिक्षक व अंगणवाडी सेविकांना या कामाचे मानधन शासनाकडून अद्यापही मिळालेले नाही. या मोहिमेत सहभागी आशा सेविकांना मात्र मानधन देण्यात आले आहे.
दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम दोन टप्प्यात राबवली. पहिला टप्पा १९ सप्टेंबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२० तर दुसरा टप्पा १८ ऑक्टोबर २०२० ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये पार पडला. या मोहिमेत आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले. या पाहणीतून समोर आलेली आरोग्यविषयक माहिती प्रत्येक पथकाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अॅपवर भरून आपले काम पूर्ण केले.
शिक्षकांनी प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती मोबाईलवर भरण्याचे काम नेटवर्कच्या व्यत्ययातही पूर्ण केले आहे. सर्वेक्षण करताना उद्भवलेल्या वादाच्या अनेक प्रसंगांना तोंड देत यातील प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी पार पाडली आहे. हे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी यात सहभागी शिक्षक व अंगणवाडी सेविकांना या कामाचे मानधन मिळालेले नाही.
आरोग्य विभागाने सर्वांचे बँक खाते नंबर घेतले आहेत, मात्र मानधनाची अजूनही प्रतीक्षाच आहे.
चाैकट
केवळ आश्वासन
या मोहिमेसाठी घेतलेल्या प्रशिक्षणात प्रत्येकाला मानधन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात तर शिक्षकांबरोबरच पथकातील प्रत्येक कर्मचाऱ्याला अधिक परिश्रम घ्यावे लागले होते.