ऑनलाइन लोकमत
आटपाडी, दि. 12 - घरनिकी (ता. आटपाडी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिकेला मुख्याध्यापकाने किरकोळ कारणावरून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवार, दि. ९ जानेवारी रोजी हा प्रकार घडूनही, अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, पीडित शिक्षिका भीतीपोटी दीर्घ रजेवर गेली आहे.
रविवार, दि. ८ जानेवारीरोजी आटपाडीत ‘नवोदय’ची परीक्षा होती. या परीक्षेसाठी घरनिकीच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जावे, असा आदेश मुख्याध्यापकांनी पीडित शिक्षिकेला दिला होता. यावर, मधुमेह आणि रक्तदाबाचा विकार असल्याने रुग्णालयात जायचे आहे. त्यामुळे आपल्याला जाता येणार नाही, अशी विनंती संबंधित शिक्षिकेने मुख्याध्यापकांना केली. त्यानंतर सोमवारी शाळा भरल्यावर मुख्याध्यापकाने या शिक्षिकेला कार्यालयात बोलावून घेततले. पण त्यांच्यासोबत ते काहीच बोलले नाहीत. १०-१५ मिनिटे तेथे थांबून पुन्हा शिक्षिका वर्गात गेली. तेथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. पुन्हा काही वेळानंतर मुख्याध्यापक त्या शिक्षिकेच्या वर्गावर गेले आणि एकेरी भाषेत बोलत, ‘तू आॅफिसमध्ये चल आणि लेखी दे’ असा दम भरला.
शिक्षिका कार्यालयात जात असताना तिच्या पाठीमागून मानेवर आणि डोक्यावर मुख्याध्यापकाने मारहाण केली. शिक्षिका मारहाणीमुळे खाली पडली. दुसºया शिक्षकांनी उठवून बसविल्यानंतर शिक्षिकेने पोलिस ठाणे आणि शिक्षण विभागाकडे धाव घेतली. मात्र अद्याप पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे यांनी, याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)