जत : मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेली पत्नी व दोन लहान मुले जत येथून बेपत्ता असल्याची तक्रार शिक्षक सुभाष कचरे यांनी जत पोलिस ठाण्यात दिली आहे. पाच दिवसांनंतरही या कुटुंबाचा शोध लागलेला नाही.सुभाष दत्तात्रय कचरे (वय ३५, मूळ रा. पळसुंदे, ता. अकोले, जि. अहमदनगर) हे गेल्या काही वर्षांपासून जत तालुक्यातील एका हायस्कूलवर शिक्षक आहेत. ते पत्नी सोनाली कचरे (वय ३०), मुले अर्णव (वय ६) व शिवम (वय ३) यांच्यासोबत जतमध्ये राहतात. दि. २८ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ते हायस्कूलवर शिकवण्यासाठी गेले. सकाळी अकराच्या सुमारास त्यांची पत्नी सोनाली हिला फोन करून मुलांना शाळेत सोडलेस का ? असे विचारले. त्यावर मुलांना शाळेत सोडायलाच चालले आहे, असे तिने सांगितले. त्यानंतर तिचा फोन बंद झाला.शाळेतून घरी आल्यानंतर त्यांचे कुटुंब घरी नव्हते. शेजारी चौकशी केली असता, दुपारपासून घर बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लगेच कचरे जत पोलिसांत कुटुंब बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास गेले, मात्र पोलिसांनी अगोदर नातेवाइकांकडे चौकशी करून नंतर तक्रार द्या, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सर्वत्र चौकशी करून अखेर कचरे यांनी पाेलिसात तक्रार दिली.गेल्या पाच दिवसांपासून कचरे यांची दोन लहान मुले व पत्नी बेपत्ता असून पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. शाळेत गेलेली मुले व पत्नी गायब कसे झाले, याचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
सर्व नातेवाइकांकडे विचारपूससुभाष कचरे यांनी सर्व नातेवाइकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र, अद्याप या कुटुंबाचा शोध लागलेला नाही. त्यांचे बरेचसे नातेवाईक जतमध्ये आले असून, तिघांचाही कसून शोध घेतला जात आहे.
सीसीटीव्ही, लोकेशनवरून पत्ता लागेना
प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी घराजवळचे सीसीटीव्ही तपासले आहेत. परंतु शहरासह बसस्थानक व इतर ठिकाणचेही सीसीटीव्ही तपासावेत, तसेच पत्नीच्या मोबाइल लोकेशनवरून शोधण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.