सांगली - ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि शिक्षक नेते डॉ. टी. डी. तथा तुकाराम धोंडीराम लाड (वय ८७) यांचे गुरुवारी पहाटे सांगलीत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी, मुलगा प्रताप, सून, नातवंडे असा परिवार आहे.
सांगलीत विश्रामबाग शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली होती. गेल्या काही वर्षांपर्यंत संस्थेत अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. एमएबीएड शिक्षणानंतर काही काळ कवठेपिरानला हिंदकेसरी विद्यालयात व सांगलीत देशभक्त नाथाजी लाड विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम केले. १९७२ मध्ये सांगलीतील काही सहकार्यांसमवेत विश्रामबाग शिक्षण संस्थेची स्थापना केली. सध्या या संस्थेअंतर्गत बालक मंदिर, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा चालविली जाते. सुमारे १७०० विद्यार्थी शिक्षण घेतात.
विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांवर त्यांनी शासनाबरोबर प्रदीर्घ संघर्ष केला. १९८५ मध्ये मंत्रालयावर मोर्चाही काढला होता. १९९६ मध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणुक लढविली होती. माजी आमदार संभाजी पवार, दिवंगत व्यंकप्पा पत्की यांचे ते निकटचे सहकारी होते. क्रांतीसिंह नाना पाटील हे त्यांचे मामा होते. शिक्षणाविषयी अतीव प्रेम असणार्या टीडी यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी बीएस्सी ॲग्रीची पदवी मिळविली. परदेशातील एका विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला होता. पंधरवड्यांपूर्वी छोट्या अपघातामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, तेव्हापासून ते झोपूनच होते. गुरुवारी पहाटे प्राणोत्क्रमण झाले. सकाळी अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.