सांगली : शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना त्रुटीवर पर्याय न शोधल्याने भरती प्रकियेतील अडथळे काही दूर होताना दिसत नाहीत. ब्रीज कोर्सची अट, मागासवर्गीयांच्या कमी जागा आणि इंग्रजी माध्यमांच्या डी. एड्. धारकांच्या प्रश्नावर तरुणांनी न्यायालयात दाद मागितली असून, आता यावरील निकालानंतरच भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरती सुरू झाली असली तरी शासनाकडून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला नसल्याने डी. एड्., बी. एड्.धारकांत अस्वस्थता आहे. एकतर सुरुवातीला २४ हजार जागांवरील भरती घोषित करून प्रत्यक्षात १० हजारांवरच जागांची प्रक्रिया राबविण्यात आल्याने तरुणांत संताप आहे.शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असतानाच, काही घटकांवर अन्याय झाल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
यासंदर्भात एकूण तीन याचिका दाखल असल्याचे समजते. त्यानुसार ज्या बी. एड्.धारकांना १ ली ते पाचवीसाठी काम करावयाचे आहे, त्यांनी ब्रीज कोर्स पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. सेवेत असताना हा कोर्स करता येत असल्याने नोकरीच्या अगोदरच हा कोर्स कसा करणार? असा सवाल बी.एड्.धारकांनी उपस्थित केला आहे.मागासवर्गीय प्रवर्गातील ५० टक्के जागांची कपात करण्यात आली आहे. यामुळे भरतीसाठी लागणारे मेरीट वाढणार असून, सर्वच प्रवर्गाला याचा फटका बसणार आहे. त्यामुळे बिंदूनामावलीत जो काही बदल करावयाचा तो करून ५० टक्के जागा आत्ताच भरण्याची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या प्रकरणात इंग्रजी माध्यमातून डी.एड्. केलेल्या उमेदवारांसाठी पूर्वी २० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आता भरती प्रक्रिया राबविताना या २० टक्के जागा कपात करण्यात आल्या आहेत. याबाबत न्यायालयाने अंतरिम निकाल देताना २० टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देश दिले असले तरी त्याचा अंतिम निकाल अपेक्षित आहे.आचारसंहितेआधी भरती पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने तरुणांत संतापाची भावना आहे.