सांगली : सांगलीत विजयनगर येथील वाॅन्लेसवाडी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात सहायक शिक्षकाचा बोगस राजीनामा तयार केल्याचा प्रकार घडला. यासंदर्भात शिक्षकाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष, सचिव व शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल झाले.न्यायालयाच्या आदेशानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. सहायक शिक्षक उमेश तानाजी जाधव (रा. कृष्ण बंगला, जयहिंद कॉलनी, विलिंग्डन महाविद्यालयानजीक, सांगली) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी मुख्याध्यापक ईश्वराप्पा मल्लाप्पा बिराजदार (रा. स्वप्ननगरी, कुंभारमळा, विश्रामबाग, सांगली), वाळवा तालुका बौद्ध सोसायटीचे सचिव विवेक दीपक धनवडे आणि अध्यक्ष दीपक धनंजय धनवडे (दोघेही रा. वाळवा) यांच्यावर गुन्हे दाखल केले.फिर्यादी उमेश जाधव हे वाॅन्लेसवाडी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मुख्याध्यापक बिराजदार तसेच संस्थेचे सचिव विवेक धनवडे व अध्यक्ष दीपक धनवडे यांनी मानसिक त्रास दिला. खोटा राजीनामा तयार केला. शाळेत नोकरीवर हजर करून घेतले नाही. माझ्यावर अन्याय केला. वारंवार तुच्छ वागणूक देऊन अपमान केला.
आरोप खोटेदरम्यान, मुख्याध्यापक बिराजदार यांनी सांगितले की, उमेश जाधव यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यांनी स्वत:हून टपालाने राजीनामा संस्थेकडे पाठवला होता. संस्थेच्या आदेशानुसार त्यांना शाळेत हजर करून घेतले नाही. त्यांना कोणत्याही प्रकार त्रास दिलेला नाही.