कामेरी : भावीपिढी निर्माण करण्याचे काम शिक्षक प्रामाणिकपणे करतो. मात्र, त्यांना अनेक शैक्षणिक व सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशावेळी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे तरच तो यशस्वी शिक्षक बनू शकतो, असे मत सिनेअभिनेते विलास रकटे यांनी व्यक्त केले.
कामेरी (ता. वाळवा) येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्मवीर शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. अनिल पाटील होते.
अनिल पाटील म्हणाले, शैक्षणिक क्षेत्राबरोबर शिक्षकाला वैयक्तिक जीवनामध्येही या व्यवस्थापनाचा उपयोग होतो. ज्याला वैयक्तिक जीवनाचे व्यवस्थापन जमले त्याला आयुष्याचे व्यवस्थापन जमेल.
यावेळी प्राचार्य अशोक पाटील, संजय जाधव, भगवान कदम उपस्थित होते. प्रा. ए. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुधीर खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संजय जाधव आभार यांनी मानले.