लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत :
ऊन, वारा थंडी अंगावर झेलून ऊसतोड करत कुटुंबाचा गाडा ढकलणाऱ्या कष्टकरी मजुरांच्या सहवासात जाऊन, मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना कपडे, खाऊ, किराणा, शैक्षणिक साहित्याचे वाटप करत शिराळा तालुक्यातील शिक्षक मित्रांनी सलग चौथ्या वर्षी आगळावेगळा ३१ डिसेंबर साजरा केला.
शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील शिक्षक काष्ठशिल्पकार अशोक जाधव, सहदेव खोत, बी. ए कांबळे, प्रताप शिंदे, प्रा. मिलिंद जाधव, मानसी जाधव, जयश्री सुतार, विनायक कुंभार, महेश पाटील हे मित्र गेल्या चार वर्षांपासून वर्षाअखेरीचा आनंद घेताना कोणताही अनाठायी खर्च न करता समाजाप्रती असलेली बांधीलकी लक्षात घेऊन कष्टकऱ्यांच्या सहवासात ३१ डिसेंबर साजरा करत आहेत. गेल्या तीन वर्षांत कोकरूड, सागाव, फुपेरे फाटा, बिळाशी आदी गावांत परजिल्ह्यांतून उदरनिर्वाहासाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या पालावर जाऊन त्यांच्या सुख-दुःखात समरस होत त्यांना कपडे व खाऊवाटप केले आहे.
यंदा कोरोनामुळे कष्टकऱ्यांच्या वाट्याला वाईट दिवस आले आहेत. कोरोनाचा धोका असतानाही ते उदरनिर्वाहासाठी मैलोदूर आले आहेत. साधारणपणे ३१ डिसेंबर हा दिवस सर्वजण आनंदी वातावरणात साजरा करतात. कष्टकरी मात्र ह्या आनंदापासून वंचित असतात. अशा कष्टकऱ्यांच्या जीवनात क्षणिक का असेना, आनंद निर्माण करण्यासाठी या शिक्षक मित्रांनी सलग चौथ्या वर्षी एकत्रित येत बिळाशी येथील ऊसतोड मजुरांच्या पालावर जाऊन त्यांना माणुसकीच्या नात्याने कपडे व खाऊ व साहित्याचे वाटप केले.
फोटो - बिळाशी (ता. शिराळा) येथे ऊसतोड मजुरांना ३१ डिसेंबरनिमित्त साहित्य वाटप करताना शिक्षक मित्र.