सांगली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडील प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या मागण्याकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शिक्षक दिनी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी राज्यातील शिक्षक सामूहिक रजेवर जाऊन शासनाच्या उदासीन धोरणाविषयी नाराजी व्यक्त करणार असल्याचे शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी सांगितले.शिक्षक समितीच्या सांगली जिल्हा कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले की, शिक्षक दिनी आंदोलनाचा निर्णय राज्य कार्यकारिणीने घेतला आहे. तशा प्रकारचे निवेदन राज्य शासनास पाठवले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी. मुख्यालय निवासाची अट रद्द करावी. नवीन शिक्षक भरती तातडीने करावी. बदलीचे नवीन प्रस्तावित धोरण रद्द करावे. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते इतर कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षकांना तातडीने मिळावेत. विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी पदासाठी बीएडची अट असावी. नगरपालिका, महानगरपालिका शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळाली, अशैक्षणिक व ऑनलाईन कामापासून मुक्तता व्हावी, यासह अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे आंदोलन केले जाणार आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील व सरचिटणीस हरिभाऊ गावडे यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणावरील बहिष्कारावर शिक्षक समिती ठाम असून कोणतेही शालाबाह्य काम शिक्षक करणार नाही, अशी भूमिका मांडली.यावेळी राज्य नेते किरण गायकवाड, विष्णुपंत रोकडे, बाबासाहेब लाड, सदाशिव पाटील, यु. टी. जाधव, उद्धव शिंदे, शशिकांत बजबळे, म. ज. पाटील, सुधाकर वसगडे, विकास चौगुले, विनोद पाटील, दयानंद मोरे, राजेश कोळी, संजय कबीर, संजय शिंदे, रमेश पाटील, तानाजी देशमुख, राजेंद्र कांबळे, श्रेणिक चौगुले, महादेव माळी, आप्पासो दळवी उपस्थित होते.
शिक्षक दिनी राज्यातील शिक्षक जाणार सामूहिक रजेवर, समितीच्या बैठकीत निर्णय
By शीतल पाटील | Published: August 30, 2023 6:59 PM