सांगली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा एकूण पदांच्या दहा टक्क्यांपेक्षाही अधिक होत असल्याने, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस बे्रक देण्यात आला आहे. जिल्ह्यातून एकही शिक्षक आंतरजिल्हा बदलीने इतर जिल्ह्यात पाठवू नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या जिल्ह्यातील २0८ शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेने प्रसिध्द केली. शासनस्तरावर संगणक प्रणालीद्वारे याबाबतची यादी निश्चित केली होती. शासनाने शिक्षक बदली प्रक्रिया शासनस्तरावरुन संगणकीय प्रणालीद्वारे राबवली आहे. जिल्ह्यातून २0८ शिक्षक बदली होऊन अन्य जिल्ह्यात जात असताना, इतर जिल्ह्यातून येणाºया शिक्षकांची संख्या अवघी ६0 आहे.
जिल्ह्यात शिक्षकांची ६ हजार ४२५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७२७ पदे सध्या रिक्त आहेत. अतिरिक्त पदे वजा जाता रिक्त पदांची संख्या ६२२ वर जाते. जिल्ह्याबाहेर जाणाºया शिक्षकांची संख्या २0८ असल्याने रिक्त जागांचा आकडा ९३0 वर जाणार आहे. इतर जिल्ह्यातून येणारे सर्व ६0 शिक्षक आले तरीही, रिक्त पदांची संख्या किमान ८७0 होते. मागील वर्षाचा अनुभव पाहता, इतर जिल्ह्यातून येणारे सर्व शिक्षक येत नाहीत. बहुतांश जिल्हा परिषदा त्या शिक्षकांना सोडतच नाहीत. त्यामुळेच जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे वाढली आहेत.
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच रिक्त पदांची संख्या एकूण पदसंख्येच्या दहा टक्क्यांपेक्षा जादा असेल, तर इतर जिल्ह्यात जाणाºया शिक्षकांना सोडता येत नाही. त्या नियमाच्याआधारेच आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना जाऊ दिले जाणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.गतवर्षाचा अनुभव वाईटमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत म्हणाले की, गतवेळी आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून अन्य जिल्ह्यातून येणाºया शिक्षकांची संख्या घटली होती. जेवढे शिक्षक येणार होते तेवढे आले नाहीत. त्याठिकाणच्या जिल्हा परिषदांनी संबंधित शिक्षकांना सोडले नव्हते. त्याचा परिणाम आता यावर्षीच्या रिक्त जागांच्या प्रमाणाबाहेर गेलेल्या संख्येवर झाला आहे. त्यामुळे नियमानुसार आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यातून जाणाºया शिक्षकांना थांबविण्याची वेळ आली आहे.