सांगली : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या मे महिन्यात होणाऱ्या बदल्या स्थगित करून कोरोनाचे संकट कमी झाले तर दिवाळीमध्ये करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांना दिले आहे, अशी माहिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिली.
धैर्यशील पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने म्हणाले की, कागल येथे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिक्षकांचे विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या बदल्या करणे योग्य नसल्याची मागणी केली. त्यानुसार ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मे महिन्यात होणार नाहीत. कोरोनाचे संकट कमी झाल्यास दिवाळीमध्ये शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. परजिल्ह्यातील शिक्षक कोरोनाच्या कामामुळे एक वर्ष आपल्या गावी गेलेले नाहीत. त्यांना मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीमध्ये गावी जाणेस परवानगी देण्यात यावी, बदलीस पात्र होण्यासाठी एका शाळेवर पाच वर्षाऐवजी तीन वर्षे अट करण्यात यावी व तसे शुद्धीपत्रक काढण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहे.