सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर गेल्याने पूर्वतयारी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली. सांगलीतील शासकीय अभ्यासिकेतील अनेक मुलींच्या डोळ्यातून या वृत्ताने अश्रू वाहू लागले.
गुरुवारी सकाळी लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. ते पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकामधील अभ्यासिकेतील मुलांमध्ये नाराजी पसरली. गेले दीड वर्ष अभ्यास करून पुस्तकांसाठी इतका खर्च करूनही परीक्षा पुढे गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. चार दिवसांपूर्वी हॉल तिकिट संकलित करण्याची सूचना दिली होती आणि आता परीक्षा पुढे ढकलल्याने त्यांना धक्का बसला. कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढत असल्याने विविध जिल्ह्यांमध्ये अनेक निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे परीक्षा घेणे अडचणीचे असल्याचे या परिपत्रकात आयोगाने म्हटले आहे.