भिलवडी
: आमणापूर (ता. पलूस) येथील शासकीय आरोग्य केंद्रातील कामचुकार डॉक्टरांची तहसीलदारांकडून कानउघाडणी करण्यात आली.
गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य समुपदेशन अधिकारी डॉक्टर सेवेत रूजू झाले आहेत. या डॉक्टरांचे नेमके काम काय, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सतत मोबाईलमध्ये गुंग असणाऱ्या या डॉक्टरांविषयी नागरिकांनी यापूर्वीच तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रारी सांगितल्या आहेत. सोमवारी कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आमणापूर येथे पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी भेट दिली. नागरिकांनी त्यांच्यासमोर डॉक्टरांच्या तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी तहसीलदार ढाणे यांनी संबंधित डॉक्टरांना चांगलेच सुनावले. कोरोना महामारीचा अत्यंत संवेदनशील काळ असून कर्तव्यात कोणतीही कसूर चालणार नाही, अशा शब्दांत तहसीलदारांनी संबंधित डॉक्टरांना झापले आहे.