मिरज : मिरजेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह जमावाने दुकाने पाडल्यानंतर मिरज तहसीलदारांनी जागामालक व कब्जेदारांना ‘जैसे थे’ परिस्थितीची नोटीस बजावली आहे. संतप्त दुकानमालकांनी नोटिसा घेण्यास नकार दिल्याने वादावादी झाली. पडळकर यांच्या कृत्याच्या निषेधार्थ रविवारी सर्वपक्षीय मिरज बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती असलेले ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत बसस्थानकाजवळ वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी दीडशे जणांचा जमाव सोबत घेऊन शनिवारी मध्यरात्री चार पोकलॅन लावून दहा दुकाने पाडून एक कोटी रुपयांचे नुकसान केले. याबाबत पडळकर यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाडलेल्या दुकानांचे अवशेष हटविण्याचे काम दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या वादग्रस्त जागेबाबत मिरजेचे तहसीलदार दगडू कुंभार यांनी कलम १४५ प्रमाणे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवून वादग्रस्त जागेत दोन्ही गटांनी काहीही करू नये, अशी नोटीस बजावली आहे. रविवारी सकाळी काही दुकानदार पाडलेल्या बांधकामाच्या दुरुस्तीच्या तयारीत असताना प्रशासनाच्या नोटिसीमुळे येथील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिल्याने जागेवर नोटीस चिटकावून व पोलिस वाहनांतून उद्घोषणा करून नोटीस बजावण्यात आली.याबाबत जागामालक व वहिवाटदार कब्जेदारांची उद्या, सोमवारी तहसीलदारांसमोर सुनावणी होणार आहे. पडळकर बंधूंच्या दबावाखाली प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला. घर, दुकाने पाडली जातात. प्रशासनाचे कोणी येत नाही. दुकानांचे पाडलेले बांधकाम पुन्हा दुरुस्त करू नये. यासाठी रविवारी सुट्टीचा दिवशी एकतर्फी नोटीस काढल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गुंडगिरी करणाऱ्या व घरे, दुकाने, उद्ध्वस्त करणाऱ्या पडळकर बंधूंना प्रशासन साथ देत असल्याचा आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी केला. पालकमंत्री अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.शहरातील मोक्याच्या जागेच्या कब्जासाठी दुकाने पाडल्याच्या निषेधार्थ मिरजेतील सर्वपक्षीय बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी नेते बाळासाहेब होनमोरे, मैनुद्दीन बागवान, पीआरपीचे इंद्रजित घाटे, मुस्तफा बुजरुक, अय्याज नायकवडी, अल्लाबक्ष काझी, जहीर मुजावर, प्रशांत सदामते यांच्यासह मिरजेतील सर्वपक्षीय पदाधिकारी व संघटनांतर्फे पडळकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.