मिरज : मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी बुधवारी निकाल देत वहिवाटदारांचा कब्जा मान्य करून त्यांच्याकडे पुन्हा कब्जा सोपविला आहे. यामुळे जागेचा कब्जा घेण्यासाठी रातोरात पाडापाडी करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांना दणका बसला आहे.वादग्रस्त जागेवरील ‘जैसे थे’ परिस्थितीचा आदेश मागे घेण्यात आल्याने कब्जेधारकांना पुन्हा बांधकाम करता येणार आहे. बेकायदा पाडापाडीप्रकरणी नुकसानभरपाईसाठी पडळकर यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे कब्जेधारकांनी सांगितले.छत्रपती शिवाजी रस्त्यावरील अमर थिएटरसमोरील ५० गुंठे जागेत सुमारे ४० वर्षे कब्जेधारक व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याकडे कागदोपत्री पुरावा उपलब्ध आहे. जागेच्या कब्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णय व कागदोपत्री पुराव्यांवरून संबंधित कब्जेधारकांचा कायदेशीर कब्जा असल्याचे तहसीलदारांनी आपल्या निकालात मान्य केले आहे. यामुळे वादग्रस्त जागा ताब्यात घेऊन ‘जैसे थे’चा आदेशही संपुष्टात आला असून न्यायालयाच्या आदेशाशिवाय पडळकर यांना वादग्रस्त जागेचा कब्जा घेता येणार नाही, असेही तहसीलदारांनी निकालात म्हटले आहे.यामुळे कब्जेधारकांना या जागेत पुन्हा व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आदेशाविरुद्ध पडळकर यांनी सत्र न्यायालयात दाद मागता येईल, असेही तहसीलदारांनी आदेशात नमूद केले आहे. या निकालामुळे वादग्रस्त जागा खरेदी करून बळाच्या आधारे तेथील व्यावसायिकांना हुसकावून लावण्याचा पडळकर यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.निकालानंतर कब्जेधारकांनी फटाके वाजवून व वकिलांना पेढे भरवून तहसीलदारांच्या निर्णयाचे स्वागत केले. ‘जैसे थे’ आदेश संपुष्टात आल्याने दुकानदारांनी जागेवर साफसफाई व पाडलेल्या भिंती बांधण्याची तयारी सुरू केली होती. कब्जेधारकांतर्फे ॲड. ए. ए. काझी, ॲड. नितीन माने, ॲड. समीर हंगड व ॲड. नागेश माळी यांनी बाजू मांडली.
मिरजेतील भूखंड प्रकरणात पडळकरांना दणका, कब्जेधारकांना पुन्हा बांधकाम करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 12:36 PM