सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याबाबत गेल्या वर्ष-दीड वर्षापासून विविध वाद निर्माण झाले आहेत. कधी फायलीवर सह्या होत नाहीत म्हणून नगरसेवक महासभेत गोंधळ घालतात, तर कधी त्यांच्यावर भाजपचे असल्याचा आरोप होतो. आता तर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीच, ते माझा दूरध्वनी उचलत नाहीत, असा गौप्यस्फोट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आयुक्त नेमके कोणाचे?, असा प्रश्न जनतेला पडला आहे.महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेऊन खेबूडकर यांना आता दोन वर्षे होत आली. पहिल्या वर्षभरात आयुक्त व महापौर हारूण शिकलगार यांचे सूत चांगलेच जमले होते. महासभेत तर, आम्ही दोघे बसून ठरवू, असे म्हणत शिकलगार अनेकदा नगरसेवकांना शांत करीत. त्यानंतर काही दिवसात त्यांच्यात बिनसले. दोघांत टोकाचा संघर्ष निर्माण झाला. कोल्हापूर रस्त्यावरील दफनभूमीच्या भूसंपादनावरून तर महापौरांनी थेट आयुक्तांवर चिखलफेकच केली. त्यानंतर आयुक्तांनी महासभेला गैरहजर राहणेच पसंत केले. तरीही सभेत महापौरांपासून नगरसेवकांपर्यंत सारेच आरोप-प्रत्यारोप करू लागले. आयुक्त खेबूडकर हे भाजपचे हस्तक आहेत, ते केवळ भाजप आमदारांच्या इशाऱ्यावर काम करतात, असा आरोपही होऊ लागला. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या फायली आयुक्तांकडे प्रलंबित राहिल्याने हा वाद आणखीनच चिघळला. आयुक्तांनी फायली प्रलंबित नसल्याचा दावाही अनेकदा केला. तरीही पालिकेतील पदाधिकारी विरूद्ध आयुक्त हा वाद पेटलेलाच आहे.आयुक्तांवर भाजपशी सलगी असल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असताना, आता खुद्द भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीच त्यांच्याबद्दल नवा गौप्यस्फोट केला आहे. आयुक्त खेबूडकर अनेकदा माझा दूरध्वनी उचलत नाहीत, कामात व्यस्त असले, तर परत दूरध्वनीही करीत नाहीत. ते माझे ऐकत नसून सत्ताधाºयांशी त्यांची मिलिभगत असल्याचे गाडगीळ यांचे म्हणणे आहे. त्यात कितपत तथ्य आहे, हा भाग अलाहिदा!महापालिका आयुक्तांनी यापूर्वी, मी राज्य शासनाचा प्रतिनिधी असल्याचे ठासून सांगितले आहे. ‘मला सांगली नवीन नाही. येथील जनता मला चांगली ओळखते. महापालिकेतील गोंधळ कशासाठी सुरू आहे, हे साºयांनाच माहीत आहे’, असे जाहीर वक्तव्यही त्यांनी मध्यंतरी केले होते. तरीही महापालिका आयुक्तांबद्दलचा वाद काही थांबलेला दिसत नाही. आयुक्त हे राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात, याचाच विसर काँग्रेस व भाजपला पडल्याचे दिसते.आयुक्तांचा दूरध्वनी : बंददरम्यान, यासंदर्भात आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा दूरध्वनी बंद होता. त्यांच्या स्वीय सहाय्यकांशी संपर्क साधला असता, खेबूडकर मुंबईत असून शुक्रवारी सांगलीत येणार असल्याचे सांगण्यात आले. खेबूडकर यांचा दूरध्वनी सायंकाळपर्यंत बंदच होता.हा तर गाडगीळांचा जुमला : महापौरमहापालिकेत काँग्रेसची सत्ता असूनही आमदारांच्या सांगण्यावरूनच आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी कामांची अडवाअडवी केली, हे सांगलीच्या जनतेला माहीत आहे. यामागे केवळ काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजपचा डाव होता. पण जनता दूधखुळी नसल्याने हा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. आयुक्तांच्या कारभारामुळे जनतेत रोष आहे. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर, आयुक्त माझे ऐकत नाहीत, असा कांगावा आ. गाडगीळ करीत असून हा त्यांचा जुमला असल्याचा पलटवार महापौर हारूण शिकलगार यांनी केला.
सांगा, महापालिका आयुक्त कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:01 AM