सांगली : जिल्ह्याचे किमान तापमान सध्या १५ अंशापर्यंत खाली आले असून, येत्या तीन दिवसात ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील किमान तापमान गेल्या सहा दिवसांपासून घटत आहे. रविवारी किमान तापमान १५ तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दिवसाही थाेड्याफार प्रमाणात थंडी जाणवत आहे. किमान तापमानाप्रमाणेच कमाल तापमानही येत्या तीन दिवसात २९ अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीसह आता दिवसाही थंडीचा सामना करावा लागणार आहे. डिसेंबर महिन्यातील सरासरी किमान तापमान १४.७ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके असते. सध्या किमान व कमाल तापमान या सरासरीच्या जवळ आहे. येत्या दोन दिवसात ते सरासरीच्या खाली येण्याची शक्यता आहे. डिसेंबरअखेर नागरिकांना घटत्या तापमानामुळे आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे लागणार आहे. सध्या आरोग्याविषयक समस्या वाढत असून, सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच थंडी आणखी वाढली तर नागरिकांना आरोग्याची समस्या अधिक सतावण्याची शक्यता आहे.