लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी : वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या वांगी (ता. कडेगाव) येथील तरुण वारकऱ्यांनी लोकवर्गणीतून ६० लाख रुपयांचे सुसज्ज असे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारले आहे.
जुन्या खानापूर तालुक्यात सर्वांत जास्त शेतीक्षेत्र असणाऱ्या वांगी गावात ताकारी, आरफळ या पाणीयोजनांमुळे आर्थिक सुबत्ता आली आहे. पैसे आल्यामुळे तरुण व्यसनाकडे वळू लागले होते. ही बाब काही तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी गावातील तरुण भक्तिमार्गाकडे वळविण्यासाठी स्वत: वारकरी बनले. त्यांनी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन व अन्नदान असे कार्यक्रम सुरू केले.
त्यामुळे गावातील बरेच युवक भक्तिमार्गाकडे वळले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील कार्यक्रमास मोठे स्वरूप येऊ लागले. मात्र जुने मंदिर मोडकळीस आले होते. कोणतीही शासकीय मदत न घेता नवीन मंदिराची उभारणी कशी करायची, या विवंचनेत ग्रामस्थ असताना मंदिर उभारणीचे शिवधनुष्य दतात्रय पाटणकर, महादेव होलमाने, अरुण मोहिते, सतपाल मोकळे, रामदास सूर्यवंशी, सचिन मोहिते, किसन मोहिते, नितीन देशमुख, राहुल सूर्यवंशी यांच्यासह काही युवकांनी घेतला.
प्रथम जुने मंदिर उतरवून नवीन मंदिराच्या कामास सुरुवात केली. गावकऱ्यांनी या युवकांवर विश्वास दाखवत मदत केली. लोकवर्गणीतून मंदिराचा गाभारा, देवाच्या नवीन मूर्ती व ४१ फूट उंच कळस असे काम केले. या कामासाठी अंदाजे ३० लाख रुपये खर्च झाला. पुन्हा सभामंडपाचा विषय आला. हा खर्च शासकीय योजनेतून करावा, असे ग्रामस्थांचे मत होते. त्यासाठी युवकांनी बराच प्रत्यन केला. मात्र त्याला यश येत नसल्यामुळे युवकांनी पुन्हा अत्यंत कष्टाने लोकवर्गणीतून तीन हजार स्क्वेअर फुटांच्या सभामंडपाचे अंदाजे ३० लाखांचे काम पूर्ण केले.
चौकट
प्रामाणिकपणाला मदत
चांगले विचार, हिंमत, मेहनत व पारदर्शी व्यवहाराने जर सार्वजनिक काम करण्याचे ठरवले तर ग्रामस्थही मदत करतात, हे त्याचे उदाहरण आहे. सामान्य कुटुंबांतील युवकांनी हिमतीने व पारदर्शकपणे लोकवर्गणीतून ६० लाखांच्या मंदिराचे काम पूर्ण केल्यामुळे परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
फोटो-३१वांगी१.२