कामेरी : कामेरीतील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शुक्रवार ११ जून ते सोमवार २१ जूनअखेर दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करणे व रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन चाचणी करून त्यात पॉझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी कामेरी ग्रामपंचायत प्रशासनाला दिले.
गुरुवारी त्यांनी कामेरी येथील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षाला भेट दिल्यानंतर दक्षता समिती व ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा करत सूचना दिल्या.
शुक्रवारपासून वैद्यकीय व दूध सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवणे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळणाऱ्या रुग्णांच्या नजीकच्या दहा-पंधरा घरांतील लोक व त्यांच्या संपर्कात आलेल्याच्या अँटिजन टेस्ट करणे. कृष्णा कारखाना निवडणूक प्रचारासाठी फिरणारे संभाव्य उमेदवार व कार्यकर्ते यांच्या अँटिजन चाचणी करणे बंधनकारक असून प्रचारासाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांना परवानगी न देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्राने अँटिजन टेस्ट वाढविण्याबाबत जनजागृती करावी व जास्तीत जास्त लोकांज्या टेस्ट कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. कामेरी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोविड नियंत्रणाबाबतच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, जि.प.चे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, जि.प. सदस्या सुरेखा जाधव, दक्षता समितीचे ज्येष्ठ सदस्य सुनील पाटील, शहाजी पाटील, नंदूकाका पाटील, अशोक कुंभार, दिनेश जाधव, मंडल अधिकारी एम.डी. पाटील, तलाठी आर.बी. शिंदे, प्रभारी ग्रामसेवक सागर मोकाशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे उपस्थित होते.