वाळवा : पडवळवाडी (ता. वाळवा) येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये जनता कर्फ्यूबाबत, सर्वपक्षीय बैठकीत १५ मेपर्यंत कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच प्रमिला यादव यांनी दिली.
प्रमिला यादव म्हणाल्या की, अत्यावशक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दवाखाने, दूध डेअरी सोडून बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
वाळवा तालुक्यातील पडवळवाडी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव. इथे आतापर्यंत २७ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आहेत. तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वाळवा येथेही चारशेचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यास दहा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी उपसरपंच अतुल कोकाटे, पोलीसपाटील मृणाल कोकाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक खोत, ग्रामसेविका शिला थिटे, ग्रामपंचायत सदस्य मारुती यादव, माधुरी खोत, काशिनाथ माळी, कमल यादव, अमर पाटील आदी उपस्थित होते.